नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात डिजिलॉकर संबंधित एक महत्त्वाची घोषणा केली आहे. डिजिलॉकर (DigiLocker) ही आता आपल्यासाठी वन स्टॉप KYC प्रणाली ठरणार असून त्यामुळे आपल्या डॉक्युमेंट्समध्ये हवे ते बदल करता येऊ शकणार आहेत. डिजिलॉकरशी संबंधित उचललेल्या या पावलामुळे डिजिटल इंडियाच्या धोरणाचा चालना मिळणार आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, केवायसी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिजिलॉकर आणि आधारचा वापर वन-स्टॉप सोल्युशन म्हणून केला जाईल. यासोबतच डिजिलॉकरसाठी वन स्टॉप केवायसी व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाईल. त्यासाठी पॅन कार्डचा अधिकृत ओळखपत्र म्हणून वापर करता येणार असल्याची घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, डिजिलॉकर आता व्यक्तींसाठी वन-स्टॉप केवायसी देखभाल प्रणाली असेल, त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांमध्ये बदल करता येतील आणि ते तुमच्या डिजिलॉकरशी लिंक केलेल्या सर्व दस्तऐवजांमध्ये दिसून येतील. डिजिलॉकर सेवा आणि आधार यांचा ओळखपत्र म्हणून वापर केला जाणार आहे. विविध सरकारी एजन्सी, नियामक आणि नियमन केलेल्या संस्थांद्वारे देखरेख केलेल्या व्यक्तींची ओळख आणि पत्ते जुळण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन सेट केलं जाईल. 


What is DigiLocker: डिजिलॉकर म्हणजे काय?


डिजिलॉकर हा डिजिटल इंडिया अंतर्गत भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आणि प्रमुख कार्यक्रम आहे. त्याचा उद्देश भारताला डिजिटली एम्पॉवर करण्याचा आणि नॉलेज इकॉनॉमीमध्ये बदलण्याचा आहे. डिजिलॉकर नागरिकांना सार्वजनिक क्लाउडवर सुरक्षित डॉक्युमेंटेशन करण्यासाठी महत्त्वाचं आहे. 


म्हणजेच या सुविधेच्या मदतीने आपल्याला ऑनलाइन क्लाउड सेवा मिळते. त्यामुळे आपल्याला कागदपत्रांची हार्ड कॉपी जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. या अॅपमध्ये आपण आधारपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि मार्कशीटपर्यंत सर्व कागदपत्रं सेव्ह करु शकतो. हे डिजिटल दस्तऐवज भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कायदेशीररित्या वैध दस्तऐवज आहेत.


How To Use DigiLocker: डिजिलॉकर कसं वापरावे?


डिजिलॉकर वापरण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या प्रमाणपत्राची प्रत स्कॅन करून त्यांच्या ई-स्वाक्षरीसह डिजिलॉकर अॅपवर अपलोड करणे आवश्यक आहे. ई-स्वाक्षरी हे स्वयं-प्रमाणित कागदपत्रांसारखे आहे.


डिजिटल इंडियासाठी केंद्र सरकार डिजिलॉकर आणि ऑनलाइन डॉक्युमेंटेशनला प्रोत्साहन देताना दिसत आहे. अशा स्थितीत येत्या काळात फोनमध्ये डिजिलॉकर अॅप आधीच इन्स्टॉल केलं जाणार आहे. म्हणजेच ते गुगल प्ले स्टोअरवरून स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.