Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज  (1 फेब्रुवारी) संसदेत (Parliament) मांडणार आहेत. आपण आपल्या घराचे बजेट जसे बनवतो त्याच पद्धतीने देशाचे बजेट बनवले जाते. रुपयाचे उत्पन्न किती असेल? त्यातून मुलांच्या फीवर किती पैसे खर्च होणार आहेत. खाद्यपदार्थांवर किती रक्कम खर्च करावी लागेल. त्याचप्रमाणे सरकार देशाचा अर्थसंकल्प तयार करते. शेकडो अधिकाऱ्यांची फौज मिळून देशाचा अर्थसंकल्प तयार कराते. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी, अर्थ मंत्रालय उद्योग संघटना आणि सर्व क्षेत्रांकडून सूचना मागवते. त्यानंतर बजेटला अंतिम स्वरुप दिलं जातं. अर्थसंकल्पाला अंतिम रुप देण्यासाठी अधिकारी सुमारे 10 दिवस बंदिवासात असतात.


अधिकारी जगापासून दूर 


अत्यंत गोपनीय अर्थसंकल्प दस्तऐवज तयार करताना, त्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचारी 10 दिवस त्यांच्या घरापासून किंवा संपूर्ण जगापासून दूर राहतात. जर तुम्ही 10 दिवसांचं मिनिटांत रुपांतर केलं तर ती 14 हजार 400 मिनिटं होतात. म्हणजेच बजेटला अंतिम रुप देणारे अधिकारी 14 हजार 400 मिनिटं जगापासून दूर राहतात. अर्थसंकल्प तयार करताना अर्थमंत्र्यांच्या अत्यंत वरिष्ठ आणि विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी दिली जाते.


कडक सुरक्षा व्यवस्था


देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. बाहेरच्या व्यक्तीला अर्थ मंत्रालयात प्रवेश करता येत नाही. बजेट दस्तऐवज तयार करणार्‍या टीमशिवाय, त्याच्या छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देखील बाहेर येण्याची किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्याची परवानगी नसते. सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज डॉक्टरांचे पथक 10 दिवस अर्थ मंत्रालयात तैनात असतं, जेणेकरुन कोणताही कर्मचारी आजारी पडल्यास जागेवरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल.


इंटरनेट वापरावर बंदी


अर्थसंकल्प तयार करताना शेवटच्या 10 दिवसांत इंटरनेट वापरावर बंदी घालण्यात येते. ज्या संगणकांवर बजेट दस्तऐवज आहेत त्यावरुन इंटरनेट आणि NIC चा सर्व्हर डिलिंक केला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगची भीती नाही. संगणक फक्त प्रिंटर आणि प्रिंटिंग मशीनशी जोडलेले ठेवतात. केवळ निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच अर्थ मंत्रालयाच्या ज्या भागात मुद्रणालय आहे त्या भागात जाण्याची परवानगी असते. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते संसदेत सादर होईपर्यंत, अर्थ मंत्रालयात गुप्तचर विभागापासून सायबर सुरक्षा सेलची सुरक्षा असते. या दिवसात मंत्रालयात मोबाईल नेटवर्क काम करत नाही. लँडलाईन फोनवरुनच संभाषण होतं.


अर्थसंकल्प विभागाची जबाबदारी


अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाच्या अर्थसंकल्प विभागाची असते. विभाग सर्व मंत्रालये, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था, विभाग आणि संरक्षण दलांना पुढील वर्षासाठी त्यांच्या खर्चाचा अंदाज सादर करण्यास सांगतो. यानंतर अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागामध्ये सर्व मागण्या आणि अंदाजांवर चर्चा करुन नंतर अर्थसंकल्प तयार केला जातो.