नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Parliament Budget Session) आजपासून सुरुवात होणार असून ते 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. 


यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे. तर मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.


राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 


अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्याने त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल (Economic Survey) संसदेच्या पटलावर ठेवतील. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.


यंदा कोणतेही नवीन कर नाही, अर्थमंत्र्यांचे संकेत


यंदा प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी  अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे वक्तव्य केलं आहे. पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही नवा कर लागणार नाही. मी स्वत: एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, त्यामुळे मी त्यांचे दु:ख समजते, असे वक्तव्य निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी केलं आहे. 


मोदी सरकारने केलेल्या आर्थिक बदलांविषयी सांगताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की,  2013 मध्ये भारत जगातील 'नाजूक पाच' अर्थव्यवस्थांपैकी एक होती. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था  आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये चढ-उतार होत असतानाही, लोकांचा  विश्वास आहे की, भारतात स्थिर सरकार आहे आणि धोरणांमध्ये असमतोल नाही. डॉलर सोडून इतर सर्व चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे.


ही बातमी वाचा: