Budget 2023 Tax :  देशाच्या अर्थसंकल्प सादर होण्याचा दिवस जवळ आला की सगळीकडे टॅक्सबद्दल चर्चा सुरू होते. कर रुपाने जमा होणाऱ्या महसुलातून सरकार लोककल्याणकारी योजना राबवते. खरेदी-विक्रीपासून ते विविध गोष्टींवर कर आकारणी केली जाते. मात्र, कधीकाळी काही भारतासह काही देशातील कर हे क्रूर होते. तर, काही ठिकाणी कर मजेशीर होते. 


स्तन झाकण्यासाठी कर 


19व्या शतकात केरळमधील त्रावणकोर संस्थानाच्या राजाने अस्पृश्य, मागास जातीतील महिलांना स्तन झाकण्यासाठी कर लादला होता. यामध्ये एझावा, थिय्या, नाडर आणि अनुसूचित जातीच्या समाजातील महिलांचा समावेश होता. या महिलांना त्यांचे स्तन झाकण्याची परवानगी नव्हती. अखेरीस नांगेली नावाच्या महिलेमुळे त्रावणकोरच्या स्त्रिया या क्रूर करातून मुक्त झाल्या. नांगेली यांनी हा कर भरण्यास नकार दिला. जेव्हा एक कर निरीक्षक त्याच्या घरी पोहोचला तेव्हा नांगेलीने कर भरण्यास नकार दिला. या कराच्या निषेधार्थ तिने आपले स्तन कापले. अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. अखेरीस वाढलेल्या जनक्षोभानंतर हा कर रद्द करावा लागला.


खिडक्यांवर कर


वर्ष 1696 मध्ये इंग्लंड आणि वेल्सचा राजा विलियम तिसरा याने खिडक्यांवर कर लागू केला होता. घरांना असलेल्या खिडक्यांनुसार लोकांना कर भरावा लागत होता. रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी राजाने ही युक्ती वापरली. ज्या घरांना 10 हून अधिक खिडक्या असतील त्यांना दहा शिलिंग टॅक्स भरावा लागत होता. करातून वाचण्यासाठी लोकांनी विटांच्या मदतीने  खिडक्या लपवण्यास सुरुवात केली. मात्र, आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला होता. अखेर 156 वर्षानंतर  1851 मध्ये हा कर रद्द झाला. 


दाढीवर कर 


वर्ष 1535 मध्ये इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याने दाढीवर कर लागू केला होता. हा कर व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार वसूल केला जात असे. हेन्री आठवा नंतर त्यांची मुलगी एलिझाबेथने (पहिली) दोन आठवड्यांहून अधिक काळ दाढी ठेवणाऱ्यांवर कर लागू केला. गंमतीचा भाग म्हणजे संबंधित व्यक्तीकडून कर जमा करतेवेळी ती व्यक्ती घरी नसल्यास त्याच्या शेजाऱ्याला हा कर द्यावा लागत असे. 1698 मध्ये रशियन सम्राट पीटर द ग्रेटने दाढीवर कर लागू केला होता. 


कराच्या जाळ्यात आत्मा 


1718 मध्ये, रशियाचा राजा पीटर द ग्रेट याने आत्म्यावर कर लादला. आत्म्यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना हा कर भरावा लागला. आत्म्यावर विश्वास नसलेल्यांकडूनही कर घेतला जात असे. धर्मावर विश्वास नसल्यामुळे त्यांच्यावर कर लावण्यात आला. याचाच अर्थ सगळ्यांनाच कर द्यावा लागत असे. चर्च आणि प्रभावशाली लोक वगळता सर्वांना हा कर भरावा लागला. यामध्येही कर वसुलीच्या वेळी करदाता घरातून गायब झाला तर त्याला तो शेजाऱ्याला द्यावा लागत असे. 


बॅचलर टॅक्स 


रोममध्ये नवव्या शतकात बॅचलर टॅक्स लागू करण्यात आला. याची सुरुवात रोमचा सम्राट ऑगस्टस याने केली होती. लग्नाला प्रोत्साहन देण्याचा यामागचा हेतू होता. तर, अपत्य नसलेल्या विवाहित दाम्पत्यांनादेखील कर द्यावा लागत असे. हा कर 20 ते 60 वयोगटातील लोकांना द्यावा लागत असे. इटालियन हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांनी 1924 मध्ये बॅचलर कर लादला. 21 ते 50 वयोगटातील अविवाहित पुरुषांवर हा कर लावण्यात आला होता.


सेक्सवर टॅक्स


1971 मध्ये अमेरिकेच्या र्‍होड आइसलँड राज्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. तत्कालीन-डेमोक्रॅटिक राज्याचे आमदार बर्नार्ड ग्लॅडस्टोन यांनी प्रांतातील प्रत्येक लैंगिक संभोगावर 2 डॉलर कर प्रस्तावित केला. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही. जर्मनीमध्ये 2004 मध्ये आलेल्या कर कायद्यानुसार,  वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना दर महिना 150 युरो इतका कर द्यावा लागतो. जर्मनीमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. मात्र, या ठिकाणी सेक्स टॅक्ससारखे कायदे लागू आहेत. 


लघवीवर कर 


प्राचीन रोममध्ये, मूत्र ही एक अतिशय महाग वस्तू मानली जात असे. याचा वापर कपडे धुण्यासाठी आणि दात घासण्यासाठी केला जात असे. मूत्रातील अमोनिया हे त्याचे प्रमुख कारण होते. रोमचा राजा वेस्पासियन याने सार्वजनिक मूत्रालयातून मूत्र वितरण कराची व्यवस्था केली होती. 


गाईंच्या ढेकरवर कर 


न्यूझीलंडमध्ये गुरांना ढेकर दिल्यावर शेतकऱ्यांना कर भरावा लागणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेल्या ग्रीन गॅसच्या समस्येला तोंड देण्यासाठी न्यूझीलंडने हे पाऊल उचलले आहे. न्यूझीलंडमध्ये ग्रीन गॅसमध्ये गुरांच्या ढेकराचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते. 2025 पासून हा कर लागू होणार आहे.