Union Budget 2024: नवी दिल्ली : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे आणि त्यामुळेच यंदाचा अर्थसंकल्पही (Budget 2024) खास असणार आहे. या आठवड्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाचा नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


निवडणुकीमुळे यंदा सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प 


अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोरारजी देसाईंशी बरोबरी करणार आहेत. यंदा लोकसभा निवडणुका होणार असल्यानं हा पूर्ण अर्थसंकल्प नसून अंतरिम अर्थसंकल्प असेल. दरम्यान, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपत आहे.


1 फेब्रुवारीलाच सादर होतो अर्थसंकल्प 


गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला सादर केला जातो. खरं तर, मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलली आहे. पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच, 28 किंवा 29 फेब्रुवारीला सादर केला जायचा. आता मात्र, अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, 1 फेब्रुवारीला सादर केला जातो. दरवर्षी अर्थसंकल्पावर जानेवारी महिन्यापासूनच चर्चा सुरू होते. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. 


अर्थसंकल्प म्हणजे, बजेट... पण बजेट शब्दाचा अर्थ माहितीय? 


येत्या काही दिवसांत देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच, बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण जाहीर करणार आहेत. पण तुम्हाला बजेट या शब्दाचा नेमका अर्थ माहितीय का? किंवा हा शब्द नेमका आला कुठून असा विचार तुम्ही केलाय का? 'BUDGET' हा इंग्रजी शब्द आहे. इंग्रजीतील इतर अनेक प्रचलित शब्दांप्रमाणे, हा शब्द देखील दुसऱ्या भाषेतून आला आहे. बजेट हा फ्रेंच शब्द bougette पासून आला आहे. Bougette हे Bouge या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ लेदर ब्रीफकेस असा होतो.


निर्मला सीतारमण यांच्याकाळात ब्रीफकेसऐवजी लाल बहिखात्याचा वापर 


आधी अर्थसंकल्प लेदर ब्रीफकेसमधून आणला जायचा. पण आता त्याचं स्वरुप बदललं आहे. याचं श्रेय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जातं. निर्मला सीतारमण यांनी 2019 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा ब्रीफकेसनं निरोप घेतला आणि त्याऐवजी लाल रंगाच्या बहिखात्याचा वापर करण्यात आला.


160 वर्षांपासून फक्त एकच गोष्ट बदलली नाही 


भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास 150 वर्षांहून जुना आहे. 1857 च्या क्रांतीनंतर, जेव्हा ब्रिटीश सरकारनं भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतला, तेव्हा भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये सादर करण्यात आला. तर, देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. अनेक दशकांच्या या प्रवासात अर्थसंकल्पात अनेक बदल झाले आहेत. आता बजेटही पेपरलेस आणि डिजिटल झालं आहे. दरम्यान, तब्बल 160 वर्षांपासून अर्थसंकल्पाच्या बाबतीतील एकच गोष्ट जशीच्या तशी आहे, ती म्हणजे, अर्थसंकल्पाचा अर्थ. अर्थसंकल्प म्हणजे, सरकारची कमाई आणि खर्च यांचा लेखाजोखा.