नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 29 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाआधी हा अर्थसंकल्प बाहेर येऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात येते. त्यासाठी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला काही दिवस अर्थमंत्रालयातच, कोणाच्याही संपर्कात न येता रहावे लागते. आजच्या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला गेल्यानंतर या टीमची सुटका होणार आहे.


अर्थसंकल्पाच्या छपाईला 'हलवा सेरेमनी' नंतर सुरुवात करण्यात येते. त्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात येते आणि या टीमला कोणाच्याही संपर्कात न येता पूर्णपणे वेगळं ठेवण्यात येतं


अधिकाऱ्यांना घरी जायला परवानगी नाही
अर्थसंकल्प तयार करणे आणि त्याची छपाई करणे ही प्रक्रिया पूर्णपणे गुप्त पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांना काही दिवस जगापासून वेगळं ठेवलं जातं. या अधिकाऱ्यांना घरी जायची परवानगी नसते. त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची सर्व सोय अर्थमंत्रालयाकडून दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे केली जाते. आतमध्ये काम करताना या लोकांचे मोबाईल अथवा इतर सर्व गोष्टी जमा करुन घेण्यात येतात. तसेच आतील सर्व संगणकांचा सर्व्हरशी येणारा संपर्कही तोडण्यात येतो. ज्यावेळी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळी या टीमला बाहेर काढलं जातं.


Union Budget 2021: बजेटच्या दिवशी सोनं खरेदी स्वस्त, सॉवरेन गोल्ड बॉण्ड विक्रीला आजपासून सुरुवात


या वर्षी कोरोनामुळे अर्थसंकल्पाची छपाई न करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. त्यामुळे या वर्षी खासदारांना बजेट संबंधी कागदपत्रे ही डिजिटल स्वरुपात देण्यात येणार आहेत.


गुप्तचर खात्याची नजर
सुरुवातीला अर्थसंकल्पासंबंधी कागदपत्रे ही राष्ट्रपती भवनमध्ये छापण्यात येत होती. 1950 सालापासून ही छपाई दिल्लीच्या मिन्टो रोड येथील एका छापखान्यात करण्यास सुरुवात झाली. 1980 सालानंतर हा छापखाना दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सुरु करण्यात आला. तेव्हापासून अर्थसंकल्पासंबंधीची छपाई इथेच करण्यात येत आहे. या इमारतीला सीआयएसएफचे कडक सुरक्षेचे कवच असते. अर्थमंत्रालयाच्या या इमारतीवर गुप्तचर खात्याची बारीक नजर असते.


आज केंद्रीय अर्थमंत्री ज्यावेळी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळी अर्थमंत्रालयातील या टीमला सोडण्यात येईल.


Budget 2021: बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी सरकारकडून पैसा येतो कुठून? उत्पन्नाची माध्यमं कोणती?