मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले. एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केल्यानंतर शेअर बाजारात (Share Mrket) मोठा स्कॅम करण्यात आला, असे राहुल गांधी म्हणाले होते. दरम्यान भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या 2023 सालचे सव्वा सहा कोटींचे शेअर्स आज सव्वा नऊ कोटी झाले, असं सोमय्या म्हणाले.


किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?


देशभरात 22 लाख लोकांनी 22 कोटी रुपये म्यूच्यूअल फंडात गुंतवलेले आहेत. या वर्षाच्या मे महिन्यात म्यूच्यूअल फंडमध्ये एका महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली. याला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेअर बाजाराचा घोटाळा म्हणणार का? 2023 साली राहुल गांधी यांच्या शेअर्सची किंमत ही सव्वा सहा कोटी रुपये होती. आता याच सव्वा सहा कोटींचे आता सव्वा नऊ कोटी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शेअर्सचे मूल्य 40 टक्क्यांनी वाढलेले आहे, असा दावा सोमय्या यांनी केला. तसेच देशातील 16 कोटी डी-मॅट अकाऊंट होल्डर, छोट्या गुंतवणूकदारांना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे घोटाळा म्हणत असतील तर देव त्यांन क्षमा करो, असा टोलादेखील सोमय्या यांनी लगावला.  


राहुल गांधी यांनी नेमका काय आरोप केला? 


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. मोदी आणि अमित शाह यांनी निवडणुकीदरम्यान गुंतवणुकीचा सल्ला का दिला? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का? भांडवली बाजारांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीमार्फत चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीच्या मालकीच्या माध्यमाला दोघांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला. याच सल्ल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर गुंतवणुकदारांचे शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या या सल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


भाजपने राहुल गांधी यांचा हा आरोप फेटाळला आहे. त्यांच्या आरोपांवर भाजपचे नेते पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत.  असे असताना राहुल गांधी वरील आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असं पियुष गोयल म्हणाले. 


हेही वाचा :


Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजना काय आहे? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर!


आयटीआर भरताना 'ही' चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत; वाचा सविस्तर!


रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील 'या' कंपनीकडून लाभांश जाहीर, 1819 टक्क्यांनी रिटर्न्स देणारी कंपनी तुम्हाला करू शकते मालामाल!