शुक्रवारी बिटकॉइनने एक ट्रिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल साध्य केलं आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकर्न्सीने गेल्या आठवड्यात 54 हजार डॉलर्सचा आकडा पार केला. गेल्या एका आठवड्यात यात 11 टक्क्यांनी वाढ झाली तर या आठवड्यात आतापर्यंत 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खरं तर, अॅलन मस्कने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, त्याचे मूल्य खूप वेगाने वाढले होते. यामध्ये टेस्ला, मास्टरकार्ड ते बीएनवाय मेलनपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. जगातील सर्व क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजार मूल्यांकन 1.7 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.
मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे किंमत वाढली
जगभरात जितके सोनं आहे, त्याचे बाजार मूल्य हे 9 ते 10 लाख कोटी डॉलर्स आहे. पण, विश्लेषकांचे म्हणणे आहे की बिटकॉइनची सध्याची किंमत त्याच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक आहे. आता जगभरात बिटकॉइनची स्वीकृती वाढली आहे, म्हणूनच आता लोक या डिजिटल चलनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर अॅपल आणि टेस्ला सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्याही बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करीत आहेत. गेल्या आठवड्यात, अॅलन मस्कची कंपनी टेस्लाने बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली. त्याचबरोबर मास-म्युच्युअल, अॅसेट मॅनेजर गॅलेक्सी डिजिटल होल्डिंग, पेमेंट कंपनी स्क्वेअर अशा बर्याच मोठ्या विमा कंपन्यांनी बिटकॉईनमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याची किंमत उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
बिटकॉइन म्हणजे काय
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर, रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंट व्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.
जगामध्ये अनेक देश बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. या संबंधी राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं होतं की देशात सध्या क्रिप्टोकरन्सी संदर्भातले कायदे हे अपूर्ण आहेत. क्रिप्टोकरन्सी संदर्भात संसदेत लवकरच विधेयक आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.