Bitcoin: कोरोना काळात सगळं जग आर्थिक मंदीत गेलं असताना बिटकॉइनची किंमत मात्र सातत्याने वाढत होती. आता बिटकॉइनची किंमत नव्या विक्रमाकडे वाटचाल करताना दिसतंय. गेल्या आठवड्यात टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर, म्हणजे भारतीय रुपयात सांगायचे झाले तर तब्बल 108 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचा परिणाम बिटकॉइनच्या किंमतीवर दिसून येत आहे. एका बिटकॉइनची किंमत आज 36 लाख रुपयांच्यावर पोहचली आहे.

बिटकॉइनची किंमतीने नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्याच्या किंमतीत अजूनही वाढ होताना दिसत आहे. बिटकॉइनमधील गुंतवणूक ही भविष्यात सोन्याच्या गुंतवणूकीला पर्याय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी या व्हर्च्युअल करन्सीच्या वापराला परवानगी दिली आहे. जगातले अनेक उद्योगपती या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत


Bitcoin: टेस्लाची बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक, बिटकॉइनची किंमत नव्या उंचीवर


काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंट व्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.


जगामध्ये अनेक देश बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. या संबंधी गेल्या आठवड्यात राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं होतं की देशात सध्या क्रिप्टोकरन्सी संदर्भातले कायदे हे अपूर्ण आहेत. क्रिप्टोकरन्सी संदर्भात संसदेत लवकरच विधेयक आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


देशात क्रिप्टोकरन्सी संदर्भातल्या एका विधेयकाला अंतिम रुप देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच हे विधेयक संसदेत सादर करण्यात येईल. या आधी आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.


Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी संबंधी सध्याचे कायदे अपूर्ण, केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार