Bitcoin: टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे बिटकॉइनच्या किंमतीने नवा विक्रम प्रस्थापित केला असून सोमवारी त्याची किंमत 43,000 डॉलर्स इतकी वाढली आहे. भारतीय रुपयात सांगायचे तर एका बिटकॉइनची किंमत 34 लाखांच्या जवळ पोहचली आहे.
कोरोनाच्या काळात बिटकॉइनच्या किंमतीत प्रचंड वाढ पहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीचा विचार करता बिटकॉइनच्या किंमतीत आता 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टेस्लाच्या या महाप्रचंड गुंतवणुकीनंतर बिटकॉइनच्या किंमतीमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
जगभरात आपल्या इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या टेस्ला कंपनीच्या वतीनं सोमवारी सांगण्यात आलं की त्यांनी बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक केली आहे. इलॉन मस्कने सांगितलं की भविष्यात ते टेस्लाच्या उत्पादने आणि कार खरेदी करणाऱ्यांसाठी बिटकॉइनच्या स्वरुपात पैसे स्वीकारु शकतात. यानंतर मात्र बिटकॉइनच्या किंमतीत उसळी पहायला मिळाली. टेस्लाच्या या निवेदनानंतर बिटकॉइनच्या किंमतीमध्ये 14 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.
काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.
भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही. बिटकॉइनमधील गुंतवणूक ही भविष्यात सोन्याच्या गुंतवणूकीला पर्याय ठरण्याची शक्यता आहे.