नवी दिल्ली : बिटकॉईन (Bitcoin) आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे (Cryptocurrency) येणाऱ्या काळात आर्थिक संकट येऊ शकतं अशी भीती बँक ऑफ इंग्लंडचे (Bank of England) डेप्युटी गव्हर्नर सर जॉन कन्लिफ (Deputy Governor Sir Jon Cunliffe) यांनी व्यक्त केली आहे. डेली मेलने याबाबत वृत्त दिलं आहे. येत्या काळात बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमती घसरतील आणि त्याचा परिणाम जागतिक आर्थिक संकटाच्या स्वरुपात  होईल असंही ते म्हणाले. 


डेप्युटी गव्हर्नर सर जॉन कन्लिफ यांनी सांगितलं की, "बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमती या घसरतील, त्या अगदी शून्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थावंर याचा परिणाम होऊन आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. ज्या संस्थांनी बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्याबाबतीत आताच काही अंदाज वर्तवण्यात येणार नाही पण याचा सर्वाधिक तोटा हा वैयक्तिक गुंतवणूकदारांना होणार आहे."


सध्याचं क्रिप्टोमार्केट हे 1.7 ट्रिलियन डॉलर्स इतकं मोठं आहे. अमेरिकेतील 2008 साली झालेल्या सबप्राईम क्रायसिसपेक्षा हे मार्केट कितीतरी मोठं असल्याचं सर जॉन कन्लिफ यांनी सांगितलं. त्यामुळे भविष्यातील मोठा धोका लक्षात घेता या क्रिप्टोकरन्सीवर लवकरात लवकर नियंत्रण आणावं असंही त्यांनी सांगितलं. या वर्षी क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटच्या मूल्यामध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


अमेरिकेची फेडरल रिझर्व बँकेनंतर जगातील सर्वाधिक सुरक्षित अशी दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून ब्रिटनच्या 'बँक ऑफ इंग्लंड'चा नंबर लागतो. या बँकातील ठेवींना 'झिरो रिस्क असेट्स' समजले जाते, त्या सुरक्षित असतात. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांच्या सोन्याच्या ठेवी या बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.


काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.