Unclaimed Amount : अनेकजण आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून ते बॅंकेत ठेवत असतो. पण अनेकदा स्वत:चा घाम गाळून कमावलेले पैसे काहीजण विसरुन जातात किंवा काही कारणास्तव ते पैसे बँकेत पडून राहतात. अशाच बॅंकेत पडून राहिलेल्या पैशांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. बँकांमध्ये 5,729 कोटी रुपये जमा असून या रक्कमेचा वालीच नाही. बँकांनी गेल्या पाच वर्षांत विविध बचत खाती आणि एफडीमध्ये जमा केलेल्या पाच हजार कोटींहून अधिक रकमेचा दावेदार सापडत नाहीयत.  बँकांकडे 5,729 कोटी रुपये जमा असून या रक्कमेवर कुणीही दावा केलेला नाही. त्यामुळे, हे पैसे नक्की कुणाचे हे शोधण्याचं काम सुरु आहे. आरबीआयने आता ही रक्कम लवकरात लवकर निकाली काढण्यास सांगितलं आहे. 


बँकांमध्ये 5,729 कोटी रुपये पडून, वालीच सापडेना


गेल्या 5 वर्षात दावा न केलेल्या ठेवी लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता (DEA) फंडातून एकूण 5,729 कोटी रुपये बँकांमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत.


दावा न केलेल्या रक्कम योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि ही रक्कम तिच्या हक्काच्या मालकाला मिळावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी लोकसभेत एका उत्तरात सांगितलं की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने "ठेवकर्ता शिक्षण आणि जागरूकता निधी योजना 2014" अधिसूचित केली आहे. यामध्ये हक्क न ठेवलेल्या ठेवींच्या नियमांचा समावेश आहे आणि निधीच्या वापराच्या तपशील आहेत. या उपक्रमांतर्गत दावा न केलेल्या रकमेचं वाटप केलं जाईल.


बँकांमध्ये DEA मध्ये किती रक्कम जमा?


विविध बँकांनी दावेदार न सापडलेली रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये जमा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 31 मार्च 2023 पर्यंत ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये 36,185 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी जमा केल्या आहेत. मार्च 2019 मध्ये, ही रक्कम 15,090 कोटी रुपये होती, तर खाजगी बँकांनी 31 मार्च 2023 पर्यंत ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये 6,087 कोटी रुपये जमा केले आहेत. 


100 दिवस 100 पेमेंट


PIB नुसार, RBI ने दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि योग्य दावेदारांना अशा ठेवी परत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मोहिमांपैकी एक म्हणजे 100 दिवसांची 100 मोहीम योजना आहे. 6 जानेवारी 2023 पासून ते 8 सप्टेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात 100 दिवसांत 100 दावा न केलेल्या ठेवीचे मालक शोधल्यानंतर संबंधित बँकांना हे पैसे परत दिले जातील.


दावा न केलेल्या रकमेच्या यादीत तुमचं नाव कसं तपासायचं?



  • तुम्ही कोणत्याही दावा न केलेल्या रकमेचे हक्कदार असल्यास आणि PNB चे ग्राहक असल्यास, तुम्ही www.pnbindia.in/inoperactive-accounts.aspx वर भेट देऊन आणि माहिती तपासू शकता.

  • HDFC ग्राहक leads.hdfcbank.com/applications/webforms/apply/HDFC_Inoperative_acc/HDFC_Inoperative_acc.aspx या लिंकवर तुमचं नाव तपासू शकतात.

  • SBI ग्राहक sbi.co.in/web/customer-care/inoperative-accounts या लिंकवर जाऊन तपासू शकतात.


बंद खाते कसं सुरु करावं?


तुम्ही तुमचं बंद झालेले बचत खाते किंवा इतर कोणतेही खाते सहज उघडू शकता. ग्राहकांना जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल आणि ते सक्रिय करण्यासाठी फॉर्म सबमिट करावा लागेल. गैर-वैयक्तिक खाती असल्यास, पत्त्यासाठी वैध दस्ताऐवज, वैध ओळखपत्र, नोंदणीकृत दस्तऐवज देणे बंधनकारक असेल.