Seema Haider News : सध्या देशात दोन प्रकरण प्रचंड चर्चेत आहेत. एकीकडे भारतीय अंजू थेट पाकिस्तानात पोहोचली आहे तर, दुसरीकडे पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) भारतात दाखल झाली. अंजूने भारतातून पाकिस्तानात जाऊन तिच्या प्रियकराशी लग्न केलं, तर दुसरीकडे सीमा हैदरने पाकिस्तानातून भारतात येऊन सचिनशी लग्न केलं. ही दोन्ही प्रकरणं साधारणपणे एकसारखीच दिसत असली, तरी त्यांचे परिणाम मात्र वेगळे आहेत. कारण अंजू भारतात आल्यावर तिच्यावर कायदेशीररित्या कोणतीही कारवाई होणार नाही. भारतात परतल्यावर अंजूचे कुटुंबीय तिच्याशी नाराज होऊ शकतात किंवा तिला तिच्या कुटुंबापासून दूरही राहावं लागू शकतं, पण तिला याची कायदेशीर शिक्षा होणार नाही. पण, जर सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात गेली तर, तिला यासाठी मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानच्या कायद्यानुसार सीमाने गुन्हा केला असून त्याची शिक्षा तिला भोगावी लागेल.


पाकिस्तानातील कायदा काय सांगतो?


सीमा हैदर आधीच विवाहित आहे आणि तिला चार मुले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा पाकिस्तानातील एखादी स्त्री तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसऱ्या पुरुषाशी लग्न करते, तेव्हा पाकिस्तानी कायद्यानुसार तो व्यभिचार मानला जातो आणि या प्रकरणात हुदुद अध्यादेशानुसार त्या महिलेला तुरुंगवास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. याचाच अर्थ असा की, सीमा हैदर पाकिस्तानात गेल्यास तिला कायद्यानुसार शिक्षा भोगावी लागेल. सीमाला तुरुंगात पाठवलं जाईल आणि तिला फाशीची शिक्षाही होऊ शकते.


पुरुषांसाठीचे नियम कोणते?


दरम्यान, पाकिस्तानात महिला आणि पुरुषांसाठी वेगळे नियम आहेत. पाकिस्तानी सीमाने केलेली चूक इतर कोणत्याही पाकिस्तानी पुरुषाने केली तर, अशा प्रकरणात त्याला शिक्षेतून सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी पुरुष इतर कोणत्याही धर्माच्या मुलीशी लग्न करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी त्याला पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचीही गरज नाही. पण, पाकिस्तानमध्ये कोणतीही मुस्लिम मुलगी गैर-मुस्लिम मुलाशी लग्न करू शकत नाही. 


पाकिस्तानातील मुलीशी लग्न करण्यासाठी स्वीकारावा लागेल धर्म


जर तुम्हाला पाकिस्तानातील मुस्लिम मुलीशी लग्न करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा धर्म बदलावा लागेल, तरच या लग्नाला पाकिस्तानमध्ये मान्यता मिळेल. दरम्यान, जगात असेही काही मुस्लिम देश आहेत जे हा नियम पाळत नाहीत आणि तेथे मुस्लिम महिलांना कोणत्याही धर्माच्या मुलाशी लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुर्की आणि ट्युनिशिया सारखे देशांमध्ये मुलींना कोणत्याही धर्माच्या मुलाशी लग्न करण्याची परवानगी आहे.


संबंधित इतर बातम्या :


Seema Haider : अक्षय कुमार आणि आलिया भट भारतात राहू शकतात, तर मी का नाही? पाकिस्तानी सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका