नवी दिल्ली : देशात टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीचा मोठा विस्तार होत असून या क्षेत्रात नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील अॅपल प्रेमींच्या संख्येत आणि ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे, ॲपलनेही उत्पादनसंदर्भाने काही निर्णय घेतले असून भारतात कंपनीकडून ॲपल मोबाईलचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे, देशात अॅपल कंपनीच्या माध्यमातून लाखो नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे एका रिपोर्टनुसार, अॅपल कंपनीकडून भारतात यावर्षी तब्बल 6 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अॅपलसह कंपनीसोबत भागिदारीत काम करणाऱ्या कंपनीमध्ये ह्या नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. तर, या नोकऱ्यांमध्ये महिलांना मोठी संधी मिळणार आहे.
जगविख्यात कंपनी असलेल्या अॅपलकडून (Apple) निर्माण केल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये थेट अॅपल कंपनीसोबत काम करण्यासाठी संधी 2 लाख उमेदवारांना मिळणार आहे. त्यामध्ये, 70 टक्के महिलांना ही संधी मिळणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मार्च महिन्यापासून ह्या नोकरीच्या (Job) संधी मिळू शकतात, अशी माहिती आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, अॅपलकडून चीनमधील (China) उत्पादन कमी करुन त्यांच्या प्रोडक्टचे उत्पादन भारतात सुरू केले जाणार आहे. कारण, अॅपलने आता विक्री व उत्पादनासाठी भारताला नवीन गड म्हणून पाहिले आहे. कंपनीकडून जास्तीत जास्त उत्पादन भारतात केलं जाणार आहे. त्यामुळे, देशातील नागरिकांना व नोकरीसाठी धडपडणाऱ्या युवकांना नोकरीच्या संधी निर्माण होतील. अॅपल आणि अॅपल कंपनीशी संलग्नित कंपन्यांच्या डेटानसंबंधित अंदाजानुसार रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. यावर्षी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे एकूण 6 लाख रोजगार निर्माण होतील.
रिपोर्टनुसारस, फॉक्सकॉन (Foxconn), विस्ट्रोन (Wistron) आणि पेगाट्रॉन (Pegatron) ने जवळपास 80,872 जॉब निर्माण केले आहेत. विस्ट्रोन आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स (Tata Electronics) बनली आहे. यासह अॅपल कंपनीला पुरवठा करणाऱ्या टाटा ग्रुप (Tata Group), सेलकॉम्प (Salcomp), मदरसन (Motherson), फॉक्सलिंक (Foxlink), सनवोडा (Sunwoda), एटीएल (ATL) आणि जबील (Jabil) या कंपन्यांनीही 84 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत.
1 थेट नोकरीसह 3 नोकऱ्या निर्माण होतात
गत काही वर्षात अॅपलने देशात जास्तीत जास्त ब्लू कॉलर जॉब निर्माण केले आहेत. ब्लू कॉलर जॉब निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये अॅपलचा समावेश असून यामध्ये युवकांसह महिलांचीही मोठी संख्या आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सन 2020 मध्ये आय स्मार्टफोन प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव स्कीम (PLI Scheme) नंतर अॅपलचे वेंडर जवळपास 1,65,000 नोकऱ्या निर्माण करु शकले आहेत. सरकारचं असं म्हणणं आहे की, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये 1 डायरेक्ट जॉबमुळे 3 इनडायरेक्ट जॉब निर्माण होत असता. म्हणजे, एका नोकरीमुळे आणखी 3 नोकऱ्या अप्रत्यक्षपणे निर्माण होत असल्याचं सांगण्यात येतं.