Reliance  Capital:  कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स कॅपिटलचा ताबा मिळवण्यासाठी 54 कंपन्यांनी बोली लावली आहे. यामध्ये अदानी फिनसर्व्ह, आयसीआयसीआय लोम्बार्ड, टाटा एआयजी, एचडीएफसी एर्गो आणि निप्पोन लाइफ इन्शुरन्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बोली लावण्यासाठीची अंतिम तारीख 25 मार्च केली होती. त्याआधी 11 मार्च ही शेवटची तारीख होती. 


या लिलावात सगभागी होणाऱ्या कंपनीत यस बँक, बंधन फायन्शिअल होल्डिंग्स, चोलामंडलम इन्वेस्टमेंट, ओक ट्री कॅपिटल, ब्लॅकस्टोन, ब्रुकफील्ड, टीपीजी, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्स या कंपन्यांचा समावेश आहे. 


कंपनी खरेदीसाठी लीलावातील बोली लावण्यासाठी काही कंपन्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. या कंपन्यांनी ईओआय देण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. रिझर्व्ह बँकेने मागील वर्षी 29 नोव्हेंबर रोजी कंपनीचे संचालक मंडळ हे पेमेंट्स डिफॉल्ट आणि व्यवसाय चालवण्याच्या मुद्यावर विसर्जित केले होते.


रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कायद्यानुसार कारवाई केलेली ही तिसरी सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC)आहे. या आधी श्रेई समूहाची एनबीएफसी आणि डीएचएफएल कंपनीवर कारवाई करण्यात आली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानींच्या कंपनीसाठी बोली लावणाऱ्या बहुतांशी कंपन्यांनी संपूर्ण कंपनी घेण्यासाठी ईओआय दिला आहे. काही कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटलच्या एक अथवा दोन उपकंपन्यांसाठी बोली लावली आहे. 


रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे.


रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ विसर्जित केल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने कंपनीच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेसाठी (CIRP) प्रशासक म्हणून नागेश्वर राव वाय यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT)मुंबई खंडपीठासमोर कंपनीविरुद्ध CIRP सुरू करण्यासाठी अर्ज केला. या वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँकेने कंपनीसाठी प्रशासक नियुक्त केला आणि रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी निविदा आमंत्रित केल्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या: