Amaranth Yatra 2022 : अमरनाथ यात्रा यंदा 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे गेले दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. आता दोन वर्षानंतर भक्तांना अमरनाथ यात्रेची पर्वणी मिळणार आहे. 


जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी अमरनाथ श्राइन बोर्डासोबत यात्रेसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीची माहिती देत राज्यपाल कार्यालयाने ट्विट करत म्हटले आहे की, 'श्री अमरनाथ यात्रा श्राइन बोर्डासोबत आज बैठक झाली. 43 दिवस चालणारी पवित्र यात्रा 30 जूनपासून सर्व कोविड प्रोटोकॉलसह आणि परंपरेनुसार सुरू होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रा संपणार आहे.'


अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने नुकतीच या संदर्भात घोषणा केली होती. एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी सुरू करण्याची घोषणा करताना, श्राइन बोर्डाने सांगितले की दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या हालचालीसाठी RFID आधारित ट्रॅकिंग केले जाईल.


अमरनाथजी श्राइन बोर्डाने अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळी यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्यांना वगळून दैनंदिन मार्गानुसार यात्रेकरूंची संख्या 10,000 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाने प्रवाशांसाठी 2.75 किमी लांबीच्या बालटाल ते डोमेलपर्यंत मोफत बॅटरी कार सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रवासासाठी निवास क्षमता, आरोग्य सुविधा, दूरसंचार सुविधा, हेली सेवा, SASB अॅप, पोनीवालांसाठी वर्षभराचा विमा यासह प्रवासी आणि सेवा प्रदात्यांच्या फायद्यासाठी या वर्षी अनेक अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha