मुंबई : अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह या बँकेने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. या बँकेने व्याजदरात (Interest Rates) 50 बेसिस पॉइंट्सने घट केली आहे. फेडरल बँकेच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेतील कर्ज घेणे स्वस्त झाले आहे. अमेरिका हा देश महासत्ता आहे. या देशाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा परिणाम जगातील इतर देशांवरही पडतो. त्यामुळे आता लवकरच इतरही देश आपल्या व्याजदरात कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतातही यासंबंधीचा निर्णय होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेनेही आपल्या व्याजदरात कपात करावी, अशी आशा कर्जदारांकडून व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास कर्ज कमी व्याजदरात मिळू शकते.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास वाट पाहात होते असे म्हटले जात होते. त्यानंतर आता फेडरल बँकेने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक पुढील महिन्यात होणाऱ्या आपल्या चलनविषय धोरण समितीच्या बैठकीत व्याजदाराबाबत निर्णय घेणार का असे विचारले जात आहे. याआधी अमेरिकन फेडरल बँक कधी व्याजदरात कपात करणार? याची फेडरल बँकेकडून भविष्यातही दोन वर्षांपर्यंत व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शक्तिकांत दास यांच्यापुढे व्याजदाराबाबत निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
अमेरिकेत कर्जावरील व्याज हे 4.75 ते 5 टक्के
अमेरिकेन बँकेने व्याजदरात कपात करण्याआधी जगातील इतर महत्त्वाच्या देशांच्या प्रमुख बँकांनी व्याजदरात कपात केलेली आहे. जगभरात व्याजदरात कपात करण्यात येत असेल तर ही भारतासाठी चांगली बाब आहे. कारण व्याजदरात कपात झाल्यास भारतात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या भांडवलात (Capital Inflows) वाढ होईल. अमेरिकन फेडरल बँक 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या बँकेने थेट 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली. या व्याजदर कपातीनंतर आता अमेरिकेत कर्जावरील व्याज हे 4.75 ते 5 टक्के झाले आहे. सध्या भारतात आरबीआयचा रेपो रेट (RBI Repo Rate) 6.5 टक्के आहे.
आरबीआयला घ्यावा लागणार निर्णय?
आतापर्यंत युरोपियन सेंट्रल बँकेने (European Central Bank) याआधी दोन वेळा व्याजदरात कपात केलेली आहे. बँक ऑफ कॅनडानेही (Bank of Canada) नुकतेच व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. भविष्यातही ही बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँक ऑफ इंग्लंडनेदेखील (Bank of England) व्याजदर कमी केला आहे. त्यानंतर आता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनेही आपल्या व्याजदरात कपात केली आहे. त्यामळे जगभरातील देश व्याजदर कमी करत असल्यामुळे आरबीआयलाही आपल्या धोरणात बदल करावा लागणार आहे. आरबीआयने आपल्या चलनविषयक धोरणात बदल केल्यास भारतातील कर्जांचे व्याजदर कमी होऊ शकतात. म्हणजेच सामान्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. त्यामुळे आता भविष्यात आरबीआय याबाबतचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
माधुरी दीक्षितची 'या' कंपनीवर खास नजर, IPO येण्याआधीच कोट्यवधी रुपये गुंतवले!