Ethanol Production: इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने चालू सत्रात इथेनॉल उत्पादनासाठी (Ethanol Production) अतिरिक्त 10 ते 12 लाख टन साखर वळवण्यास मान्यता देण्याची विनंती सरकारला केली आहे. साखरेचे जास्त उत्पादन होण्याच्या अंदाजादरम्यान इस्माने ही मागणी केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळामुळे साखर उत्पादनात होणारी संभाव्य घट लक्षात घेता, सरकारने चालू 2023-24 सत्रात (ऑक्टोबर-सप्टेंबर) इथेनॉल तयार करण्यासाठी साखरेच्या 'डायव्हर्जन'ची मर्यादा 17 लाख टन निश्चित केली आहे. 


15 जानेवारीपर्यंत 149.52 लाख टन साखरेचे उत्पादन 


इस्माने दिलेल्या माहितीनुसार, चालू सत्रात 15 जानेवारीपर्यंत साखर कारखान्यांनी 149.52 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील 157.87 लाख टनांच्या तुलनेत 5.28 टक्क्यांनी कमी आहे अहवालानुसार, सध्याचे हवामान ऊसाच्या पिकासाठी अनुकूल आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख राज्यांच्या ऊस आयुक्तांनी 2023-24 च्या साखर हंगामासाठी त्यांच्या साखर उत्पादनात सुधारणा केली आहे, असे इस्माने निवेदनात म्हटले आहे. अंदाज सुधारित करुन, त्यात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. इस्माने निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षात साखरेचे उत्पादन पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, इस्माने सरकारला विनंती केली आहे की इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त 10 ते 12 लाख टन साखर वापरण्याची परवानगी द्यावी. इथेनॉल निर्मितीसाठी अतिरिक्त साखर वापरण्यास परवानगी दिल्यानंतरही पुढील हंगामात काही महिन्यांसाठी साखर शिल्लक राहील.


कॉर्नपासून बनवलेल्या इथेनॉलला प्रोत्साहन देण्याची घोषणा


2023-24 (नोव्हेंबर-ऑक्टोबर) इथेनॉल पुरवठा वर्षासाठी ऊसाचा रस, सरबत, बी-हेवी मोलॅसेसपासून उत्पादित इथेनॉलच्या खरेदी खर्चात तत्काळ वाढ करण्याची घोषणाही ISMA ने सरकारकडे केली आहे. सरकारने नुकतेच मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. परंतू, ऊसाचे पीक पाणी, पोषक तत्त्वे, जमिनीचा वापर किंवा कार्बन जप्तीच्या बाबतीत मक्यापेक्षा अधिक कार्यक्षम असल्याने, ऊसालाही सरकारकडून अधिक मदत मिळणे आवश्यक आहे. ISMA च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू 2023-24 हंगामातील 15 जानेवारीपर्यंत देशात 149.52 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील 157.87 लाख टनांपेक्षा थोडे कमी आहे. या हंगामात आतापर्यंत सुमारे 520 कारखाने सुरु होत्या, तर वर्षभरापूर्वी याच काळात 515 गिरण्या सुरू होत्या.


साखरेचा दुसरा अंदाज या महिन्यात येणार


देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात चालू हंगामात 15 जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन 50.73 लाख टनांवर गेले आहे. तर वर्षभरापूर्वी याच काळात साखरेचे उत्पादन हे  60.26 लाख टन होते. त्याचप्रमाणे, देशातील तिसरा सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या कर्नाटकातील उत्पादन 33.58 लाख टनांवरून घसरून 31.16 लाख टन झाले आहे. आकडेवारीनुसार, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशचे उत्पादन चालू हंगामात 15 जानेवारीपर्यंत 45.73 लाख टनांपेक्षा जास्त होते, तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत ते 40.65 लाख टन होते.