Adani Group On Bank Loan: जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहातील कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या चर्चांना अदानी समूहानेच (Adani Group) पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला आहे. अदानी समूहावर असलेल्या कर्जाबाबत (Loan On Adani Companies) कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीवर असलेले कर्ज कमी झाले असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेण्यात आलेले निम्मे कर्ज फेडले असल्याचे अदानी समूहाने सांगितले. 


काही दिवसांपूर्वी क्रेडिटसाइट्सने एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यामध्ये अदानी समूहावर प्रचंड कर्ज असल्याचे म्हटले गेले होते. या अहवालाला अदानी समूहाने उत्तर दिले आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कंपनीने सातत्याने आपले कर्ज फेडले आहे. कर्ज आणि व्याज, Tax Before Income किंवा एबिटा उत्पन्नाचे प्रमाण घटून 3.2 पट इतके राहिले आहे. नऊ वर्षांपूर्वी हे प्रमाण 7.6 पट इतके होते. 


कंपनीने म्हटले की, अदानी समूह एक सरळमार्गी परंतू सशक्त आणि पुन्हा अवलंब करता येईल अशा व्यावसायिक मॉडेलवर काम करत आहे. विकास, परिचलन आणि व्यवस्थापन आणि भांडवलाचे व्यवस्थापन करणे हे उद्दिष्ट्य आहे. अदानी समूहाकडे असलेल्या रक्कमेचा विचार करता, समूहावर मार्च 2022 पर्यंत 1.88 लाख कोटी रुपयांचे सकल कर्ज असून 1.61 लाख कोटी रुपयांचे निव्वळ कर्ज होते. 


सरकारी बँकांचे कर्ज घटले 


अदानी ग्रुपने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, वर्ष 2015-16 मध्ये त्यांच्या समूहातील कंपन्यांवर असलेल्या सार्वजनिक बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे प्रमाण घटले आहे. या वर्षात घेतलेल्या कर्जाचे प्रमाण 55 टक्के होते. हे प्रमाण वर्ष 2021-22 मध्ये घटून 21 टक्के इतकेच राहिले. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये खासगी बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे प्रमाण 31 टक्के होते. त्यात आता घट झाली असल्याचे अदानी समूहाने म्हटले. 


क्रेडिटसाइट्सच्या अहवालाने काय म्हटले?


क्रेडिटसाइट्सने मागील महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार, अदानी समूह प्रचंड कर्ज घेऊन उद्योगाचा विस्तार करत आहेत. या कर्जाच्या रक्कमेतून समूह मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्रात उतरत असल्याकडे अहवालाने लक्ष वेधले होते. आर्थिक परिस्थिती बिघडल्यास अदानी समूहातील उद्योग-व्यवसाय कर्जाच्या विळख्यात वाईटपणे अडकू शकतात. 


अदानी समूहाने मागील काही वर्षांतच मोठ्या वेगाने आपल्या उद्योगाचा विस्तार केला आहे. कोळसा खाण, बंदर, विमानतळ, डेटा सेंटर, सिमेंट, अॅल्यूमिनियम आणि शहरी भागात गॅस वितरण आदी महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रात आपले वर्चस्व तयार केले आहे.