Gautam Adani : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) हे काही वेळेसाठी दुसऱ्या स्थानावर आले होते. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलिनियर्सच्या यादीत काही वेळेसाठी गौतम अदानी दुसऱ्या यादीवर आले होते. त्यांनी फ्रान्सचे उद्योगपती Bernard Arnault  यांना मागे सारले. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती  155.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली होती. मात्र, काही वेळेनंतर अदानी पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आले.  


गौतम अदानी यांची संपत्ती सध्या 155.2 अब्ज डॉलर इतकी आहे. टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलन मस्क हे श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 273.5 अब्ज डॉलर इतकी आहे. 


गौतम अदानी यांच्या संपत्तीत आज वाढ झाली. त्यांच्या संपत्तीत एकूण 4.9 अब्ज डॉलरची वाढ झाली. तर, एलन मस्क यांची एकूण संपत्ती  789 दशलक्ष डॉलरने वाढली. तर, फ्रान्सचे उद्योजक Bernard Arnault संपत्तीत आज 3.1 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली. त्याशिवाय, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक घट झाली. 


मुकेश अंबानी यांना पछाडले


गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाली. गौतम अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात त्यांनी  अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले होते. 


अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांना दुसऱ्या स्थानी आणण्यास मदत करणाऱ्या कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्सने उच्चांक गाठला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर सुरुवातीच्या व्यापारात 3865.60 रुपये प्रति शेअरवर पोहोचले होते. 52 आठवड्यांतील हा उच्चांकी दर आहे. त्याच वेळी, मार्केट कॅपच्या बाबतीतही कंपनीने नवीन उंची गाठत LIC आणि ITC सारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. शेअर्सच्या वाढीमुळे या कंपनीचे मार्केट कॅप 4.31 ट्रिलियन रुपयांवर पोहोचले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: