Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Aadhaar Email Update : आधार कार्ड धारकांपैकी ज्यांनी अद्याप ज्यांचा ईमेल आयडी आधारशी लिंक केलेला नाही किंवा बदललेला ईमेल आयडी नोंदवला नाही त्यांच्यासाठी ही संधी आहे.

मुंबई : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. ज्या आधार कार्ड धारकांनी त्यांचा ई मेल आयडी बदलला असेल आणि तो आधारच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केला नसेल तर तो मोफत अपडेट करण्याची संधी आहे. आधार मोबाईल ॲपद्वारे ईमेल आयडी मोफत अपडेट करता येणार आहे.
द यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ॲपद्वारे ईमेल आयडी अपडेट करण्यावरील शुल्क माफ केलं आहे. यापूर्वी ई मेल अपडेटसाठी 75 रुपये शुल्क द्यावं लागायचं मात्र 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत आधारमध्ये ईमेल मोफत अपडेट करता येईल.
31 डिसेंबरपर्यंत मोफत सुविधा
आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट करण्याची सुविधा 31 डिसेंबरपर्यंत मोफत असेल. या सुविधेचा वापर करुन आधार कार्ड धारक त्यांचा ईमेल आयडी बदलू शकतात. ज्या आधार कार्ड धारकांनी आतापर्यंत ईमेल आयडी नोंदवला नसेल तो नोंदवू शकतात. तर, याशिवाय ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी बदलला असेल ते देखील तो बदल अपडेट करु शकतात. आधार कार्ड धारकांना महत्त्वाच्या सूचना मिळाव्यात म्हणून त्यांचे संपर्काचे तपशील अद्ययावत करण्याची संधी देण्याचा हेतू असल्याचं म्हटलं. आधार कार्ड ईमेल अपडेट 31डिसेंबरपर्यंत विनाशुल्क असेल. ते देखील आधार मोबाईल ॲपद्वारे अपडेट केल्यास असणार आहे.
आधार ॲपद्वारे ईमेल आयडी अपडेट कसा करायचा?
स्टेप 1. अधिकृत आधार ॲप तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करा, किंवा फोनमध्ये अगोदरपासून उपलब्ध असेल तर ते अपडेट करा.
स्टेप 2.आधार मोबाईल ॲप ओपन करुन आवश्यक ती माहिती भरुन लॉगीन करा.
स्टेप 3. तुमचा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
स्टेप 4. ॲपवर जी माहिती विचारली जाईल ती नोंदवा
स्टेप 5. स्क्रीनवर ज्या सूचना दिल्या असतील त्याचं पालन करुन पडताळणी पूर्ण करा
नाव, जन्मतारीख, फोन नंबर अपडेट सेवा सशुल्क
आधार कार्ड धारकाला जर नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा इतर माहिती अपडेट करायची असल्यास त्यासाठी शुल्क द्यावे लागेल. प्रत्येक अपडेटसाठी स्वतंत्र नियम आणि वेगळं शुल्क आकारलं जाईल. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किती शुल्क द्यावं लेगाल याची माहिती घ्यावी.
मोफत ऑनलाईन आयडी, पत्ता मोफत अपडेट करण्याची मुदत जून 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे. माय आधार पोर्टलद्वारे ओळखीचा पुरावा आणि पत्ता अपडेट करण्यासंदर्भातील सेवा मोफत असतील. या सेवा 14 जून 2027 पर्यंत मोफत उपलब्ध असतील.























