Eighth Pay Commission नवी दिल्ली : केंद्र सरकारनं जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाबाबत घोषणा केली होती. मात्र, आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं नाही. यासंदर्भात लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला सरकारच्यावतीनं उत्तर देण्यात आलं आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीअगोदर सरकारनं प्रमुख स्टेकहोल्डर्ससह गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय यांच्याकडून इनपूट मागवल्या आहेत.
खासदार टीआर बाळू आणि आनंद भदोरिया यांच्याकडून आठव्या वेतन आयोगाबाबतच्या जानेवारीतील घोषणेनंतर आयोगाची निर्मिती करण्यास उशीर होत असल्यानं प्रश्न विचारला होता. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नव्या वेतन आयोगाला तेव्हाच लागू केलं जाईल, जेव्हा वेतन आयोगाकडून त्याची शिफारस करेल आणि त्यानंतर सरकार त्या शिफारशी स्वीकारेल, असं म्हटलं. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत घोषणा करुन सहा महिने उलटले असले तरी सदस्य, आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आता आठव्या वेतन आयोगाच्या सदस्यांच्या आणि अध्यक्षांच्या नियुक्तीचं नोटिफिकेशन जारी करण्याची प्रतीक्षा आहे.
आठव्या वेतन आयोगासंदर्भात माहिती मागितली
वेतन आयोगाच्या स्थापनेसंदर्भात अजून स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही. त्यामुळं खासदारांकडून यामध्ये होत असलेल्या उशिराबाबत प्रशन् विचारण्यात आले. खासदारांनी अध्यक्ष, सदस्यांची नियुक्ती याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स बाबत सविस्तर माहिती मागवली. मात्र, वित्त मंत्रालयाकडून आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्तीसह टर्म ऑफ रेफरन्सची वाट पाहिली जात आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात टर्म ऑफ रेफरन्स निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत नोटिफिकेशन देखील काढण्यात आलेलं नाही.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाबाबत उत्सुकता लागलेली आहे. केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची नियुक्ती केली जाते. आयोगाकडून महागाई आणि इतर घटकांचा विचार करुन मूळ वेतन, भत्ता आणि बोनस सह इतर सविधांमध्ये वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जातो. सातवा वेतन आयोग केंद्र सरकारनं 1 जानेवारी 2016 ला लागू केला होता. त्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे. त्यामुळं आठव्या वेतन आयोगात काय शिफारशी असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. याशिवाय सातव्या वेतन आयोगाप्रमाणं शेवटचा महागाई भत्ता देखील येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो. महागाई भत्ता जानेवारी आणि जुलै असं दोनवेळा दिला जातो.