एक मिटिंग, नवी बाजारपेठ: यंदाच्या दिवाळीतील सौरदिव्यांमागे उभी असलेली उद्यमी नेटवर्कची ताकद
उद्यमी महाराष्ट्र बाजारात पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिकमधील 233 मराठी उद्योजक सहभागी झाले. परस्पर सहकार्य, नव्या बाजारपेठा आणि व्यवसायवृद्धीला या उपक्रमातून चालना मिळाली.

राजेंद्र आणि अनुराधा फुकणे हे आपल्या राजश्री एंटरप्रायझेस या कंपनीअंतर्गत सौरदिवे आणि भेटवस्तूंच्या वस्तू तयार करतात. अनेक लघुउत्पादकांप्रमाणेच, त्यांच्यासमोरील आव्हान उत्तम दर्जाची उत्पादने तयार करण्याचे नव्हते, तर ती नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे होते. या समस्येवर उपाय त्यांना एका अनपेक्षित ठिकाणी मिळाला. उद्यमी महाराष्ट्रच्या फेडरेशन ऑफ मराठी एंटरप्रेन्योर्स (FME) च्या बैठकीत त्यांची एका सहउद्योजकाशी भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या व्यवसायासाठी नव्या बाजारपेठेचे दार खुले झाले.
या उद्योजकांच्या नेटवर्कचे सदस्य असलेले मोहसिन हे विक्रीसाठी नवीन उत्पादने शोधत होते. त्यांची फुकणे दाम्पत्याशी एकदा चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी फुकणे यांच्या उत्पादनांची विक्री सुरू केली. सणासुदीचा हंगाम सुरू होण्याच्या अगदी आधी उत्पादकांना विक्रीसाठी एक नवीन माध्यम मिळाले, तर व्यापाऱ्याच्या उत्पादनांच्या यादीत एका नव्या उत्पादनवर्गाची भर पडली.
उद्योजकांनी एकमेकांना सहकार्य करून परस्परांच्या व्यवसायाची वाढ साधणे, हीच संकल्पना रविवार, 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या उद्यमी महाराष्ट्र बाजाराच्या केंद्रस्थानी होती. या एकदिवसीय बाजाराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या पाच शहरांमध्ये एकाच वेळी करण्यात आले. या उपक्रमात 233 उद्योजक सहभागी झाले, तर सुमारे 3,000 व्हिजीटर्सनी या बाजाराला भेट दिली.
एकाच शहरातील अनोळखी उद्योजक, संध्याकाळपर्यंत व्यावसायिक भागीदार
डॉ ॐकार हरी माळी यांच्या नेतृत्वाखालील उद्यमी महाराष्ट्र परिवारातील अनेक सदस्य एकाच शहरात राहतात, मात्र यापूर्वी त्यांची एकमेकांशी भेटही झालेली नव्हती. या उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्यात व्यावसायिक सहकार्य वाढवणे, हा या बाजाराच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता. या उपक्रमातून उद्योजकांना ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी मिळालीच, शिवाय एकमेकांशी परिचय करून घेणे, ग्राहकांची परस्परांना शिफारस करणे आणि एकमेकांच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे मार्ग शोधणेही शक्य झाले. अनेक उद्योजकांसाठी आपला व्यवसाय आत्मविश्वासाने इतरांसमोर सादर करण्याचा हा एक सराव ठरला. प्रदर्शनांमध्ये आणि खरेदीदार-विक्रेता संमेलनांमध्ये सहभागी होताना हे कौशल्य त्यांना भविष्यात उपयुक्त ठरणार आहे.
केवळ खाद्यपदार्थ आणि फॅशनपुरते मर्यादित नाही
या बाजारात व्हिजीटर्सना नेहमीच्या स्टॉल्सपेक्षा बरेच काही पाहायला मिळाले. मिलेटपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कृषी उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तू यांच्यासोबतच अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक उत्पादने, व्हेंडिंग मशीन, सॉफ्टवेअर आणि व्यावसायिक सेवांचेही स्टॉल या प्रदर्शनात होते. उद्योजकांच्या सहभागाच्या बाबतीत पुणे शहर आघाडीवर होते. येथे सर्वाधिक 103 उद्योजक सहभागी झाले. त्यानंतर ठाणे येथे 64, मुंबईत 38, तर नागपूर आणि नाशिक येथे प्रत्येकी 14 उद्योजकांनी सहभाग नोंदवला.
उद्यमी महाराष्ट्रचे संस्थापक डॉ ॐकार हरी माळी म्हणाले, “उद्यमी बाजार हा केवळ एका दिवसासाठी उत्पादने विकण्याचा उपक्रम नाही. तर उद्योजकांना आत्मविश्वासाने आपला व्यवसाय सादर करता यावा, एकमेकांना जाणून घेता यावे आणि एकत्रितपणे प्रगती साधता यावी, यासाठीचे हे व्यासपीठ आहे. प्रत्येक व्यवसायाला आपली क्षमता दाखवण्याची आणि उजळून निघण्याची संधी मिळेल, असा उद्योजकांचा समुदाय उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
2020 मध्ये स्थापन झालेल्या उद्यमी महाराष्ट्राने 32,000 हून अधिक मराठी तरुणांना उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांना अन्न मिळावे या आदर्शाने प्रेरित होऊन, डॉ ॐकार प्रत्येक जिल्ह्याला वैयक्तिक भेट देतात आणि तेथील सदस्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेतात.
Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.
















