राम तेरी गंगा मैली हो गई.... चित्रपटातल्या या गाण्याच्या ओळी आज खासकरुन आठवतात. त्याला कारण आहे.. ते म्हणजे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातल्या चौसा स्मशान घाटात, गंगेच्या तिरावर सापडलेले 40 हून अधिक मृतदेह. ही दृश्ये जरी पाहिली तरी मन विषण्ण होतं. कोरोनाने माणसाला माणसापासून दुरावलंय. पण, ते इतकं की माणसांच्या जगात माणुसकी कुठे आहे? मरण इतकं स्वस्त झालंय? माणसाचे अंत्यविधीही करता येऊ नयेत? असे एक ना अनेक प्रश्न मनाला भेडसावतायत.


आपल्या नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांची परवड होऊ नये, यासाठी पालिकेने ऑनलाईन बुकिंग सुरु केलंय. अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रेशनच्या दुकानाबाहेर लावाव्यात तशा रांगा लावाव्या लागतायत. एकाच सरणावर मृतदेह टाकून अंत्यविधी केल्याची विदारक दृश्येही उभ्या महाराष्ट्राने पाहिली. मात्र जिचं पाणी आपण आपल्या देवघरात ठेवतो, त्या गंगा नदीच्या तिरी मृतदेहांचा खच पडला होता. वाचनात आल्यानुसार अंत्यविधीसाठी लाकडं मिळाली नसल्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडले. गरिबीमुळे अंत्यविधीसाठी होणारा खर्चही परवडेनासा, कोरोनामुळे मृतदेह जाळण्यासाठी जागा मिळत नाहीय, त्यामुळे नातेवाईक मृतदेह गंगेत सोडतात.


बिहार, उत्तर प्रदेशातल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे याआधीही अनेकदा निघालेत. आता तर कोरोनामुळे ऑक्सिजनअभावी रुग्ण रस्त्यावरच जीव सोडतायत. सायकलवरुन कोरोनाग्रस्त पत्नीचा मृतदेह सायकलवरुन नेणाऱ्या पतीची व्यथाही देशाने पाहिली आहे. आता तर कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांचे लचके जनावरं तोडतायत. गरीब जनता मायबाप म्हणून सरकारकडे पाहते. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. खाण्यापिण्याचीही वानवा दिसतेय. असं असताना किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी अंत्यविधीची जबाबदारी ही प्रशासनाची नाही का? मृतदेह यूपीतले असून बिहारमधले नाहीत, असं सांगत स्थानिक प्रशासन चालढकल करतेय. मात्र, गंगा सध्या संथ असल्याने मृतदेह वाहून बिहारमध्ये कसे येऊ शकतात, असा सवालही साहजिकच निर्माण होतोय.   


देशात कोरोनामुळे परिस्थिती भीषण झालीय. रुग्णवाहिका मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, बेड मिळत नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आहे, लसींचा तुटवडा आहे. त्यात स्थानिक रुग्णालयातली अवस्थाही भयावह आहे. सरकार दरबारी जन्म मृत्यूची नोंद आवश्यक आहे. मात्र बिहारमधल्या या घटनेनंतर मृत्यूनंतरही प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणे मृतदेहाची होणारी अवहेलना याचीही नोंद झाली पाहिजे, असं आवर्जून नमूद करावंसं वाटतंय. कोरोनाचं संकट अधिक गहिरं होतंय, घातक होत चाललंय. आणखी काही आजार उद्भवण्याची भीतीही निर्माण झालीय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम होणं, ती करणं हीच काळाची गरज आहे.


गंगा.. जगाच्या पाठीवर अतुलनीय, अविश्वसनीय अशा संस्कृतीचं प्रतिक. आपल्य़ा भारतीय हिंदू संस्कृतीत गंगा नदीला विशेष स्थान आहे. आयुष्याचा शेवट समीप आला की गंगेचं पाणी तोंडी घातलं जातं. गंगेत डुबकी मारली की पापक्षालन होतं, गंगेचं दर्शन घेतलेला व्यक्ती म्हणजे पुण्य कमावलेला, अशी विचारांनी आपल्या पिढ्या चालत आल्यात. काही अंशी आपणही तेच मानतो. कदाचित, म्हणूनच गंगा माता सर्वकाही आपल्या पोटात सामावून घेते, असं समजून माणसाने गंगेला नाला बनवलंय, दूषित केलंय.


गंगोत्रीतून उगम पावणारी पवित्र गंगा कोट्यवधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. कनोज, कोलकाता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटणा, प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद ही ऐतिहासिक शहरं गंगाकिनारी वसलेली आहेत. गंगेमुळे खरी विकासाची गंगा पोहोचली. धरणं, कालवे बांधली गेली. जलविद्युत प्रकल्प उभारला गेला. गंगेचं पाणी म्हणजे मोठ्या क्षेत्रांसाठी बारमाही सिंचनाचा स्त्रोत आहेत. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या गंगातिरी अनेक पर्यटनस्थळं आहेत. गंगा नदीवर राफ्टिंगसारखे खेळही आयोजित केले जातात. धार्मिक पर्यटनस्थळांमुळे गंगा किनारी राहणाऱ्यांचं उत्पन्न स्त्रोतही गंगाच आहे.


गंगेची ही सर्वसमावेशक ओळख बदलतेय. गंगेचा श्वासच कोंडतोय, याला कारणही आपणच आहोत. नमामी गंगेसारखे प्रकल्प हाती घेतले जातात. मात्र त्याच गंगेच्या पाण्यातून रक्ताचा प्रवाह वाहतोय, हे कुणाच्याच नजरेस येत नाहीय की दुर्लक्ष केलं जातंय? राम राज्याची भाषा आपण करतो. मंदिर, मस्जिदसाठी कोट्यवधींची देणगी गोळा करतो, दान देतो. मात्र कोरोनाच्या या महासंकटाने हेच शिकवलंय की मंदिर, मस्जिद ही मनःशांतीसाठी उभारली जात असली तरी जीव वाचवण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम हवी. ज्या देशात, ज्या मातीत रामाच्या मंदिरासाठी लढा दिला जातो, त्याच राज्यात आरोग्य यंत्रणा कमकुवत ठेवून जीवनदायिनी गंगा मैली केली जातेय, हे आपलं दुर्दैवच नाही का?


वृषाली यादव यांचे यापूर्वीचे ब्लॉग


International Mother’s Day 2021 : आज आहे आईचा दिवस...


BLOG |‘सामाजिक’ बलात्कार कधी थांबणार?


BLOG | 'शिक्षक' आपल्याला समजलेत का?