पाच-सहा समविचारी तरुण कोरोनाच्या या भयाण वातावरणात आपण घरी राहून लोकांना कशी मदत कशी करू शकतात याचा विचार करतात. त्यानंतर ठरतं की आपण मनमोकळ्या गप्पा मारायच्या लोकांबरोबर ज्यांना घरात बसून कंटाळा आलाय, कोंडून घेतल्यासारखं वाटतंय, मानसिक दडपण आलंय, अस्वस्थ वाटतंय, खूप बैचैन झाल्यासारखं वाटतंय. राज्यातील विविध भागातील तरुणांच्या या ग्रुपची पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे, या पोस्टमध्ये त्यांनी आपले मोबाईल नंबर दिले आहेत. त्यामध्ये ते असं आवाहन करतात की, अशा परिस्तिथीत कोणीतरी मनापासून, आस्थेने विचारपूस करणारे, बोलणारे, ऐकणारे असावे असे वाटते? आम्ही आहोत, उचला तुमचा फोन आणि करा कॉल. या टीममध्ये डॉक्टर, समुपदेशक आणि सामाजिक भान जपणारे सहकारी असून हे आहेत. 'फोन ए फ्रेंड' तुमच्या दुःखावर फुंकर घालणारे.
महारष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात लोक लॉकडाऊनमुळे घरी आहेत, जी लोक घरून काम करू शकतात अशी मंडळी 'वर्क फ्रॉम होम' करत आहे. मात्र ज्यांना हा पर्याय नाही त्यांना मात्र दिवस कसा घालवावा याची चिंता सतावत असते. अशा स्थितीत काही लोकं, घरी, कामाच्या ठिकाणी एकटे असतील तर त्याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यवर होण्याची शक्यात नाकारता येत नाही. कुणाशी किती वेळ कोणत्या विषयवार बोलायचं हे ही त्यांना कधी कधी कळत नाही. सातत्त्याने एकच गोष्ट ऐकून नकारत्मक विचार मनात घोंगावत असतात. अशा काळात प्रेमाचे दोन शब्द कुणीतरी आपुलकीने विचारले किंवा गप्पा मारल्या तरी एकांतात असणाऱ्यांना आनंद मिळत असतो, याचं धर्तीवर मदत करण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी एकत्र आली आहे.
याविषयी माहिती देताना, या टीमचा सदस्य डॉ . ऋषिकेश आंधळकर सांगतो की, "आरोग्यसाच्या या आणीबाणीच्या परिस्थितीत प्रचंड आर्थिक, सामाजिक नुकसान तर होतच मात्र या बरोबर या परिस्तिथितीचा मानवी मनावर मोठा मानसिक आघात होत असतो. अचानक आलेली सद्यस्थितीही मनाला धक्का देणारी आहे. सांगली-कोल्हापुर महापुरामध्ये मदत कार्य करत असताना याची जाणीव आम्हाला झाली होती. या मानसिक ताणाची गरज ओळखून आम्ही सर्व सहकारी मिळून 'मोकळा संवाद' हा उपक्रम एकलव्य, पालवी, मैत्री संस्था व ह्युमन सोसायटी यांच्या सहकार्याने चालू केला.
'आम्ही हा उपक्रम 25 मार्चला सुरु केला. आम्हाला आतापर्यंत सगळ्याना मिळून 120 पेक्षा जास्त लोकांनी संपर्क केला असून, यामध्ये फक्त महाराष्ट्रचेच नव्हे, तर कोलकत्ता, अहमदबाद, इंदोर, दिल्ली येथील लोकांनी संपर्क केला असून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. माझ्यासोबत या टीममध्ये तेजस घाडगे, गिरीश महाजन, अविनाश किनकर , राधिका टाक, अनुष्का कपड़िया हे सहकारी काम करत आहेत. प्रत्येक येणारा कॉल हा वेगळा असतो, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. काही लोकांना घरात माणसं आहे म्हणून त्रास होतोय तर काहीं ना घरी कुणीच नाही म्हणून त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.'
लोकांचा मानसिक ताण हलका करण्याचं काम सध्या ही टीम करत असून अनेक लोकं याना विविध प्रश्न घेऊन संपर्क करत आहेत. अमरावतीत राहणाऱ्या अनुष्का कपाडिया, ज्यांनी मास्टर इन मेंटल अँड इमोशनल सायकोलॉजी विषयात प्राविण्य मिळविलेल्या या टीमच्या सदस्य आहेत. त्या सांगतात, 'कोरोनामुळे लोकांच्या मनावर नक्कीच ताण येईल, हे एक मानसिक समुपदेशक म्हणून वाटतचं होत. तेव्हा 'मोकळा संवाद' या उपक्रमामधे सहयोग द्याल का ? ही विचारणा झाली असता, पहिल्या क्षणला काही विचार न करता हो म्हणून टाकलं. लोक घाबरलेली आहेत, प्रत्येक फोन हा धन्यवाद देत, बोलून मन हलक झालं असं सांगून ठेवला जातो, याचं समाधान आहे.
विशेष म्हणजे कॉल करण्यामध्ये पुरुषांचा क्रमांक खूप मोठा आहे, यामध्ये 15 वर्षाच्या मुलांपासून ते 60 वर्षाच्या व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये सामान्य तक्रारी आहेत. अनेकांना कोरोन विषाणूंचा प्रादुर्भाव होईल का याची चिंता आहे, कुणाला आता यापुढे आमचं कसं होणार, यामुळे भीती वाटत आहे. तर कुणी नोकरी राहील की जाईल यांची चिंता भेडसावत आहे. काही लोकांना घरात वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलं घरात आहे त्यांना काही होणार नाही ना, याचं मानसिक दडपण आलं आहे.
अविनाश किनकर, त्यांचा अनुभव सांगताना एका कॉलरची माहिती देतो. 'एक कॉल बडोद्यावरून आलेला, तो हॉटेल चालवतो. मूळचा चाळीसगावचा. लॉक डाऊनमध्ये कर्मचारी निघून गेले. त्यातला एक सायकलवर 40 किमी गेला, तसा तो नेहमीच जातो. एक जण चालत गेला 50 किमी. ते पोहचूपर्यंत जेवण जाणार नाही असं बोलला. एकटाच होता शटर डाऊन हॉटेलमध्ये , त्याला जायचे होते पण अडकला. एकटं वाटत नव्हतं पण बोलायला मित्र नाहीत. अजून अविवाहित आहे. खूप बोलावसं वाटतं बोलला. मी त्याला कधीही वाटलं तर कॉल कर असे बोललो. आजवर दोन कॉल केले. लॉकडॉउन आणि लग्न याबद्दल चिंतीत आहे.'
अशा पद्धतीने समाजातील काही तरुण, सामाजिक संस्था अशाचप्रकारे विविध शक्कल लढवून घरीच बसून समाजातील नागरिकांना मदत करत आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून आपण सुद्धा समाजासाठी काही करू शकलो तर नक्कीच याचा समाजाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग
BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार