अख्ख्या विश्वात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं (कोविड-19) आगमन भारतात होऊन 15 पेक्षा जास्त दिवस झालेत. सध्या देश वेगळ्या संकटातून मार्ग काढत पुढे सरकत आहे. नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी आणि या विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, या टाळेबंदीच्या काळात आपल्या देशातील नागरिकांचं वेगळच रूप सध्या बघायला मिळत आहे. काही स्वघोषित आहारतज्ज्ञांना रोज ताजा भाजीपाला खाण्याचे जणू काही डोहाळे लागले आहेत. रोज तोंड वर करून मंडईत गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. या अशा काही 'उंगलीखोर' व्यक्तिमत्वामुळे आजही मंडईत गर्दी होताना दिसत आहे. या बंदच्या काळात त्यांचा पाककला हा गुण हा त्यांना साद घालत असून दिवसभरात उठता-बसता खाण्याचे नवनवीन पदार्थ बनविण्याची स्पर्धा सध्या 'फॅमिली ग्रुप' मध्ये सुरु आहे.


या बंदच्या काळात अनेक जणांचा व्यायाम करणे, सकाळी चालणे या त्यांच्या रोजच्या दिनचर्येवर निर्बंध आले आहेत. यातूनही काही जण मार्ग काढत जमेल त्या पद्धतीने शरीराला वळण देणायचा प्रयत्न करीत आहेत. येथे विशेष नमूद करावंसं वाटतं असं कि, घरातील समस्त महिला वर्गासोबत काही पुरुषमंडळीही 'खाना-खजाना' या योजनेत तितक्याच जोमाने सहभाग घेत असून वेगळे पदार्थ बनविण्याचे यशस्वी आयोजन केले जात आहे. जर आज सामाजिक माध्यमे बघितली तर आपणास लक्षात येईल की, बहुतांश लोकं त्यांनी केलेल्या नवनवीन डिशेशचे फोटो टाकून वाहवाह मिळवत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे जे कुणी असे खाण्याचे पदार्थ बनवत नव्हते त्यांच्यावर उगाचच एक प्रकारचा 'सामाजिक दबाव' निर्माण झाला आहे, आणि त्यांनीही जमावाचा भाग बनण्यात स्वारस्य दाखविले आहे. तसेच ,ज्यांना अजिबात पदार्थ बनवायला येत नव्हते ते 'रेडी टू ईट' ची पाकिटे आणून पदार्थ बनविण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

या सगळ्या प्रकारात अनेकांनी जो स्वयंपाक करण्याचा आत्मविश्वास गमावला होता तो त्यांना आता परत मिळाला आहे. अनेक जण पोळ्या बनविण्याचे तंत्र विसरले होते, मात्र आज ते गर्वाने पोळी बनवत असल्याचा संदेश व्हाट्सअॅप वरून आपल्या मित्रांना पाठवत आहे. उगाच टोमणे नको म्हणून नातलगांना पाठविणे मात्र टाळत आहे. बरं एवढं करून पाककला येथे थांबत नसून किचनचा ओटा कसा साफ करायचं याचं नवीन तंत्रज्ञान शोधल्यासारखं भासवून ओटा साफ केला जात आहे. भांडी धुण्यावरून जोडीदारांमध्ये सौम्य 'राडा' होत आहे, परंतु त्यातही आळीपाळीने हा उपक्रम सुरु आहे. काही जण मात्र घरी झाडू मारल्याचे, वॉश बेसिन किंवा टॉयलेट साफ करण्याचे फोटो मात्र अभिमानाने स्टेटस वर ठेवत आहेत. त्यांना अभिमान वाटणं साहजिकच आहे, नियमित स्वरूपाची असणारी ही काम अचानक अनेक वर्षांनी केल्यामुळे त्यांना असा सुखद आनंद मिळणे सहाजिकच आहे.

या सर्व भानगडीत जे काही जुने जाणते घरातील वरिष्ठ मंडळी आहेत, ते एरवी जेवणात मीठ कमी पडलं तर कुरकुर करणारे मात्र हे 'आर अँड डी' केलेले 'बहुढंगी-विविधरंगी' पदार्थाना जोरदार दाद देत या पाककृतीचा आस्वाद घेण्यात मश्गुल झाले आहेत. या सर्व प्रकारात बच्चे कंपनीचीही चांगलीच चंगळ झाली आहे, अनेक वेळा न मागता भारी पदार्थ पुढ्यात येत आहे. महिला वर्गाने तर बुद्धिमतेचा पूर्ण कस लावून नवनवीन रेसिपी शोधण्याचा चंगच बांधला आहे. खाणे-पिणे या वर घरातील अनेक मंडळी थांबली नाहीत तर, महिला बचत गटाकडून विकत घेणारे वाळवणीचे पदार्थ घरीच बनविण्यास सुरुवात केली आहे. दुपारचा वेळ कसा निघून जातो हे त्यांची आता कळेनासे झाले आहे. कुणी मग, डाळीच्या वड्या, सांडगे, पापड, कुरड्या या आजीच्या आणि आईच्या आठवणी काढत हे सर्व पदार्थ बाल्कनी किंवा टेरेसवर सुकविण्यास टाकत आहे.

कोरोनच्या या भयभीत वातावरणात एकंदर काय तर सर्वच जण आपलं मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सर्व दिवसात शारीरिक आकारमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हेही त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, त्यामुळे वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट आपण कधीच विसरता काम नये, या सुंदर पदार्थ खाण्याच्या मेजवानीत अनके गरीब गरजू ज्यांना दोन वेळेचं अन्न मिळत नाही याच भान ठेवा. आज आपलं मस्त चाललंय हे म्हणण्यापेक्षा, आपण दोन गरीबांना थोडंसं अन्न पुरविले तर त्यापेक्षा आनंदाचा क्षण नाही. यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, व्यवस्थित शोध घेतला तरी आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं सापडतील.

संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग


BLOG | सारे जमीन पर ...


BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना


BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क

BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा

BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?

BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!

BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही!