आज संपूर्ण देशात विविध रुग्णालयातील नर्सेस, सुरक्षा किट मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहे. खरं तर त्यांच्यावर अशा तक्रार करण्याची वेळ येता कामा नये, कर्तव्य बजावत असताना रुग्णांची काळजी घेण्याबरोबर त्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं, त्यांनाही कुटुंब आहे. परंतु आज सोशल माध्यमांवर आपण पाहिलं असेल की आज नर्सेस इतक्या मेटाकुटीला आल्या आहेत की त्या उघडपणे सुरक्षा किट मिळत नसल्यच्या तक्रारींचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर टाकत आहेत.
कोरोनासारख्या युद्धाशी सक्षमपणे मुकाबला करायचा असेल तर या युद्धात आघाडीवर असणाऱ्या आपल्या परिचारिकांना हत्यारं म्हणजेच सुरक्षा किट द्यावेच लागेल, जर युद्धात त्या घायाळ झाल्या तर ही लढाई लढणं मुश्किल होईल, याचा विचार केला गेला पाहिजे. ही वेळ कुणाबद्दल तक्रार करण्याची नसून प्रशासन यावर नक्कीच काम करत असून काही अडचणी निर्माण होत असतील तर त्यांनी यावर मात करून लवकरच तोडगा काढला पाहिजे. तसेच आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की अशा प्रसंगात प्रशासन जाणून बुजून सुरक्षा किट न देण्याचं पाप ते त्यांच्या अंगावर घेणार नाहीत. काही प्रशाकीय अडचणी असाव्यात, हे परिचारिकांनीही समजून घेतले पाहिजे.
संपूर्ण जगात 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्याशी निगडित असणाऱ्या समस्या आणि त्यावर तोडगा, विचार विनिमय करण्यासाठी याच दिवशी 1948 साली आरोग्य संमेलन पार पडले. यामध्ये सर्वानी एकत्र येऊन आरोग्य समस्या या एकत्रिपणे येऊन सोडवायच्या असा निर्धार केला गेला. मानव धर्म डोक्यात ठेवून, कोणत्याही वंशाचा विचार न करता या आरोग्य समस्यांवर सामान उपाय शोधणे हे निश्चित केलं गेलं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार 7 एप्रिल 1950 पासून हा दिन नित्यनियमाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात झाली. दरवर्षी जागतिक स्तरावरील आरोग्याशी संबंधित महत्वाचा विषय घेऊन त्यावर सांगोपांग चर्चा करणे हा या दिवसाचा उद्देश.
ज्यावेळी जागतिक स्तरावर साथीच्या रोगांचे मोठे गंभीर प्रश्न निर्माण होतात त्यावेळी जागतिक आरोग्य संघटना फार मोलाची कामगिरी बजावत असते. यावर्षी, जागतिक आरोग्य संघटनेने 'परिचारिका आणि दायींना आधार' अशी थीम निश्चित केली असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. दायी ह्या विशेषतः महिलांच्या गरदोरपणात आणि बाळाच्या संगोपनात महत्वाची भूमिका बजावत असतात. आजही ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा अपुरी पडते, परिचारिका किंवा डॉक्टर नसतात अशावेळी दायी जमेल त्या पद्धतीने आरोग्य उपचारांशी निगडित प्रश्नावर तोडगा काढत असतात.
कालानुरूप परिचारिकांच्या अभ्यासात विविध बदल होत गेले, आता नर्सेस थेट त्याविषयात सविस्तर प्रबंध सादर करून पी एच डी मिळवत आहेत. डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून अजून त्या रुग्णांना उपचार देत आहेत. परिचारिका ज्यावेळी आपल्या अभ्यासाला सुरुवात करून 3 महिने पूर्ण करतात आणि थेट जेव्हा रुग्ण सेवा प्रशिक्षणास सुरुवात करतात. त्यावेळी त्या या व्यवसायाशी निगडित शपथ घेतात किंवा प्रतिज्ञा करतात. ती शपथ खूपच विचार करायला लावणारी आहे, त्याचा वेगळा सोहळा हा प्रत्येक नर्सिंग कॉलेज मध्ये पार पडत असतो. 'परमेश्वर व ही सर्व मंडळी यांच्या समक्ष मी अशी प्रतिज्ञा करते की, मी माझे सर्व आयुष्य, आणि माझा व्यवसाय विश्वासूपणाने करण्यांत घालवेन. जे काही वाईट व अनिष्ट आहे, त्या पासून अलिप्त राहीन. इजा होणारे औषध स्वतः घेणार नाही आणि हेतुपरस्पर इतरांनाही देणार नाही. माझ्या व्यवसायचा दर्जा उंचविण्याकरिता मी सतत प्रयत्न करेन. मला समजलेल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक गोष्टी मी गुप्त ठेवेन. मी डॉक्टरांना निष्ठापूर्वक सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन, आणि माझ्यावर सोपविलेल्या रुग्णाच्या सेवेत मी स्वतःला वाहून घेईन'.
कोरोनाच्या या भयाण परिस्थितीत काही डॉक्टर व परिचारिकांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणं अनेक ऐकली आहेत. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एकाच वेळी 25 पेक्षा जास्त परिचारिकांना लागण झाली आहे. त्यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. रुग्णाच्या उपचारात मोलाची भूमिका बाजवणाऱ्या या परिचारिकांची सुरक्षा महत्वाची असून स्वतःचा जीव धोक्यात घालून मेहनत घेणाऱ्या या आया-बहिणींच्या कार्याला सलाम.
संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग
BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार
BLOG | कोरोना वातावरणातले तुम्ही सारे खवय्ये
BLOG | सारे जमीन पर ...
BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!