संपूर्ण भारतात तिसऱ्या टाळेबंदीच्या टप्प्यात लोकांचा जीव फारसा रमताना दिसत नाही, प्रत्येकजण कंटाळलाय, लॉकडाउनच्या नावाने बोटं मोडतोय, संयम किती दिवस बाळगायचा अशा चर्चा सध्या व्हाट्सअॅप ग्रुपवर रंगतायत. काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी एक वेबीनारला संबोधित करताना सांगितले की, भारताला कोरोना विषाणूंसोबत जगायला शिकावे लागेल. कारण अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोना हा काही दिवसात संपुष्टात येणार विषय नाही, हळूहळू याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे आता सगळ्यांनीच टाळेबंदी उठल्यानंतर, सुरक्षिततेचे सर्व नियम आपल्या नवीन जीवनशैलीत सामावून सोशल डिस्टंनसिंग पद्धतीचा अवलंब करत कोरोनासोबत जगणं ही काळाची गरज ठरणार आहे.


शासनाच्या आरोग्य विभागाने 5 मे रोजी जाहीर केल्याला आकडेवारीनुसार सध्या महाराष्ट्रात 15 हजार 525 रुग्ण कोरोनाबाधित असून 617 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे लक्षणंविरहित आहेत. वैद्यकीय शास्त्रानुसार, एखादा व्यक्तीला संबंधित आजाराबद्दल कोणतेही लक्षणं नसणं. मात्र, जर त्याची आजारासंबंधित असणारी चाचणी केली तर तो आजार त्याला असल्याचं चाचणीत स्पष्ट होणं याला लक्षणंविरहित रुग्ण असे म्हणतात. तसेच त्याला त्या आजाराचा वाहक, असंही म्हटलं जाऊ शकतं. लक्षणविरहित रुग्ण हे अनेकवेळा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबातील सदस्य, त्यांचे शेजारी असू शकतात किंवा अनेक आरोग्य कर्मचारी जे ह्या रुग्णांवर सध्या उपचार करत आहेत, असे अनेक जण. त्याचप्रमाणे काही लक्षणंविरहित रुग्ण असेही आढळून आले आहेत, की ते कुठेही इतर रुग्णांच्या संपर्कात आलेले नाहीत.


मूर्ती यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे सूतोवाच काही दिवसांपूर्वीच केले आहे. संपूर्ण जगाला कोरोनाने बदलून टाकले आहे. प्रत्येकजण कोरोनाच्या धास्तीने नवे बदल स्वीकारत आहेत. सहा महिन्यापूर्वी कुणी स्वप्नात विचारही केला नसेल की रस्त्यावरचा प्रत्येकजण मास्क लावून फिरेल. मात्र, आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर प्रत्येक नागरिक मास्क घालून फिरत आहे.


या पुढे जेव्हा किराणा मालाची महिन्याची यादी करण्यात येईल, त्यावेळी सॅनिटायझर, मास्कचा पण घरातील साठा पुरेसा आहे कि नाही याची काळजी करून दर महिन्याला ते विकत घेणे अनिवार्य ठरणार आहे. कारण यापुढे अनिश्चित काळापुरत्या या गोष्टी तुमच्या सोबत ठेवाव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे मास्क नसेल तर स्वछ रुमाल दुसऱ्याशी सवांद साधताना नाका - तोंडांवर ठेवणे बंधनकारक असण्यापेक्षा जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणार आहे. त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी न जाणे, संवाद साधताना व्यक्तींनी पुरेस अंतर ठेवून बोलणे या सुद्धा गोष्टी ओघाने आल्याच, शिवाय लहान मुलांसाठी त्यांच्या पालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वरिष्ठ नागरिक त्यातही ज्यांना अगोदर पासून काही व्याधी आहे जशाच्या की उच्च रक्तदाब, मधुमेह यांनी जास्त काळजी घ्यावयाची आहे. याला तुम्ही इंग्रजीत ज्याला सर्व वैद्यक शास्त्रातील तज्ञ सध्या 'न्यू नॉर्मल' अशा शब्दाने संबोधित आहे. काही दिवसापासून अनेक डॉक्टर मंडळी वेबिनारच्या माध्यमातून नवनवीन ज्ञानाची देवाण घेवाण एकमेकांसोबत करीत आहे. त्यावेळी हमखास चर्चेला येणार शब्द म्हणजे 'न्यू नॉर्मल' असा आहे.


डॉ. अनिल पाचनेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, सांगतात की, "आता आपण काही गोष्टी या मान्य केल्या पाहिजे आणि त्यांना गृहीत धरूनच आपले दैनंदिन जीवनमान सुरु ठेवले पाहिजे. कोविड19 हा एक विषाणू आहे, तो असा इतक्यात नष्ट होणार नाही. सहा महिने ते वर्षभरापर्यंत तो टिकू शकतो. नागरिकांनी शक्यतो नवीन जीवनशैली आत्मसात करणे गरजेचं आहे. टाळेबंदीनंतर तुम्ही जेव्हा घराबाहेर पडाल त्यावेळी मास्क घालून बाहेर पडायचं, सॅनिटायझरचा योग्य तो वापर करून हात स्वच्छ धुणे. तसेच दररोज संतुलित आहार करणे आणि व्यायाम करणं आता गरजेचं ठरणार आहे. विशेष म्हणजे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि सोशल डिस्टंनसिंगचा वापर करणे."


आरोग्य तज्ज्ञांनुसार जोपर्यंत चालता-बोलता धडधाकट माणूस हा लक्षणंविरहित रुग्ण असू शकतो की नाही हे त्याची चाचणी केल्यावशिवाय सांगणे कठीण आहे. आता ह्या नियमानुसार कुणीही माणूस हा लक्षणंविरहित रुग्ण असू शकतो. दुसरा विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत लक्षणंविरहित रुग्णाकडून संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या दिसत असणाऱ्या रुग्णांच्या आकड्यात लक्षणंविरहित रुग्णांचे प्रमाण हे लक्षणीय आहे. त्यामुळे लोकांनी उगाच घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक आहे.


कोरोनाच्या या वाढत्या थैमानाचा परिणाम लोकांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात झाला असून त्यावर आता मात करायची असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करून नागरिकांनीच आता पुढाकार घेण्याची हीच ती वेळ. आरोग्यव्यवस्था आणि प्रशासन त्याचं काम करत आहेत आणि शेवटपर्यंत करतील. मात्र, आपण नागरिक म्हणून सुद्धा आपले कर्तव्य पार पडले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळयांनी स्वतःला एक शिस्त लावून घेतली पाहिजे. या कोरोनामय वातावरणात काही नागरिकांची मानसिकता नकारात्मक झाली आहे, ती नकरात्मकता दूर करण्याकरिता योगासने, प्राणायामचा वापर केला गेला पाहिजे. कोरोनाबरोबर जगायचं नवीन वेळापत्रक आखून उद्याकरिता सगळ्यांनीच सकारत्मक दृष्टिकोन ठेवून सज्ज झालं पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग