संपूर्ण देशात कोरोनाविरोधात लढाई सुरु असताना, अगदी पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणांपासून बहुतांश वैद्यकीय तज्ञांनी वरिष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेने अधिक असल्याचे सांगितले होते. आपल्या राज्यात कोरोनाचा प्रवेश होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने तयार केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालातून मोठ्या प्रमाणात तरुण कोरोनाबाधित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तरुणांनी फाजील आत्मविश्वास न बाळगता स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.


आपल्याकडे नऊ मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग हा नित्याने या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रोज वैद्यकीय अहवाल तयार करत आहे. या अहवालात त्यांनी 11 वयापासून ते 110 वयापर्यंतच्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या माहितीचा अभ्यास केला आहे. या सर्व अहवालातून जे निष्कर्ष काढले जाऊ शकतात त्यामध्ये महत्वाचा निष्कर्ष म्हणजे सद्य साथीत वरिष्ठ नागरिकांसोबत मोठ्या संख्यने कोरोनाने तरुणांना आपली जाळ्यात ओढलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुरुषांचा आकडा महिलांपेक्षा अधिक आहे. तर मृत्यु दरातही पुरुष महिलांपेक्षा पुढे आहे.

राज्य शासनाने 17 एप्रिलच्या अहवालात तयार केलेली ही आकडेवारी दुर्लक्षित करून चालणार नाही. यामध्ये 21 ते 50 वयोगटात 1716 जण कोरोनाबाधित झाले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 ते 20 या वयोगटात 240 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, ही संख्या लक्षणीय असून लहान मुलांनी आणि त्याबरोबर त्यांच्या पालकांनी सर्तक राहणे गरजेचे आहे. सुदैवाने यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसून या वयोगटातील रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. तसेच 51 ते 90 जणांच्या वयोगटात 831 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 139 जणांचा मृत्य झाला आहे. तर विशेष म्हणजे 91 ते 100 या वयोगटातील 5 जणांना कोरोनाची बाधा झाली असून सर्व जण उपचाराला प्रतिसाद देत आहे. तर 101 ते 110 या वयोगटातील एक रुग्ण कोरोनाबाधित होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

चीन आणि इटलीमध्ये मात्र चित्र थोडं वेगळं आहे. या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये सर्वाधिक रग्ण हे 60 वर्षाच्या वरील आहेत. या अहवालात 2916 रुग्णांचा समावेश असून, 1738 पुरुषांना कोरोनाची लागण झाली असून 1178 महिलांचा समावेश आहे. तर अहवालात एकूण 194 मृत्यूंपैकी 127 पुरुष मृत्युमुखी पडले असून 67 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. तात्याराव लहाने सांगतात की, "या अहवालातून तरुणांना मोठ्या संख्यने बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे .त्यामुळे त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. तरुणांनी उगाचच आपल्याला काही होत नाही धुंदीत राहू नये, त्यांनी सुद्धा घरात बसून स्वतःची काळजी घ्यावी. शासनाने दिलेल्या प्रत्येक नियमांचं पालन प्रत्यकानेच केले पाहिजे. या अहवालातून आपणास दिसून आले आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव कोणालाही होऊ शकतो." या सर्व वैद्यकीय अहवालावरून आता सर्वांनीच काळजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता घरीच बसणार आणि कोरोनाला हरवणार आणि दुसऱ्या लॉकडाऊनच्या शेवटच्या म्हणजे तीन मे पर्यंत रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी मदत करणार अशीच प्रतिज्ञा घेण्याची वेळ आली आहे.

  संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग