एक्स्प्लोर
मैत्रिणी, घाबरु नकोस; काळजात धडधडलं तरी आवाज उठव!
पण एक मुलगी, महिला म्हणून मला सांगावंसं वाटतं की जर आपण तोंडातून आवाज काढला तर आपण अनेक वाईट गोष्टी होण्यापासून रोखू शकतो..

रात्री नऊचं बुलेटिन संपलं.. मेकअप काढला आणि रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अंधेरीच्या अंधाऱ्या रस्त्यांवरुन चालायला सुरुवात केली. रस्त्याने जाताना एका व्यक्तीचा हात माझ्या हाताला लागला.. मला तो स्पर्श वेगळा वाटला.. काही वेळाने लक्षात आलं की हा माणूस मला फॉलो करतोय.. मी चालण्याचा वेग कमी-जास्त करुन बघितला आणि खात्री पटली. त्याच वेळी मागच्या 7-8 दिवसात आपणच सांगितलेल्या 2-3 बातम्या डोक्यात घोंगावू लागल्या.. सीएसटी स्टेशनवर एक्सप्रेसमध्ये तरुणाचा तरुणीकडे बघत हस्तमैथुन, अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा विनयभंग, चर्चगेट स्टेशनवर उभ्या असलेल्या तरुणीला तरुणाने नको तिथे केलेला स्पर्श आणि मारलेला धक्का..
या एक एक बातम्या नजरेसमोरुन गेल्या; दृश्यांसकट.. आणि डोक्यात तिडीक गेली.. आता माझ्यासोबतही तसंच काहीसं घडतंय का?! तो व्यक्ती पाच एक मिनिट, कधी माझ्या मागून तर कधी माझ्या बाजूने चालत होता.. ही गोष्ट लक्षात आली आणि मग्ग मी त्याला विचारलंच, 'ए सून, फॉलो क्यूँ कर रहे हो?'.. त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि चालण्याचा वेग वाढवला.. मी मागून त्याचा टी-शर्ट खेचला आणि पुन्हा विचारलं, 'अबे फॉलो क्यूँ कर रहा है?!'.. आता तो बिथरला, म्हणाला 'मैं कहा फॉलो कर रहा हूँ?!'.. मग्ग मात्र भर रस्त्यात मी आवाज चढवला आणि म्हटलं 'कर भी मत! नहीं तो बिच रास्ते में लाकर मारुँगी, चल भाग'.. त्यानंतर 10 सेकंदात पळत पळत लेफ्ट टर्न घेत तो अदृश्य झाला..
हा सगळा प्रसंग सविस्तर सांगण्यामागचं कारण म्हणजे असे प्रसंग प्रत्येक मुलीच्या आयुष्यात अनेकदा येतात.. त्याला शाळेत जाणारी पोर असो, चित्रपट कलाकार असो किंवा माझ्यासारखी न्यूज अँकर; कुणीही अपवाद नसतं! अशा वेळी एक क्षण भीती वाटतेच.. पण जर आपण आवाज वाढवला तर समोरच्या लिंगपिसाटाची फेफे उडते.. कारण मूळात अशी नीच कृती करणारी माणसं आतून भित्री असतात.. त्यामुळे आपण म्हणजे मुलींनी आपला आवाज वापरायलाच हवा..
सीएसटीवरची घटना असो, चर्चगेटवर तरुणीचा झालेला विनयभंग असो; एका मागोमाग एक या बातम्या समोर आल्या.. यानंतर महिला सुरक्षित आहेत का, पोलिस काय करतायत, अशा लिंगपिसाट लोकांचं करायचं काय, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.. त्यावर सविस्तर, सखोल चर्चाही झाल्या.. त्यामुळे या मुद्द्यांवर इथे वेगळं लिहायची गरज नाही..
पण एक मुलगी, महिला म्हणून मला सांगावंसं वाटतं की जर आपण तोंडातून आवाज काढला तर आपण अनेक वाईट गोष्टी होण्यापासून रोखू शकतो.. सीएसटीतला प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन समाजासमोर आणणाऱ्या त्या तरुणीचा आदर्श आपण घ्यायला हवा, तिने पोलिसांना भाग पाडलं कारवाई करायला आणि 10 दिवसांनंतर तो विकृत अशोक प्रधान गजाआड गेला.. चर्चगेट स्थानकावर नको तिथे हात लावणाऱ्याची गचांडी पकडणाऱ्या मुलीकडून आपण शिकायला हवं.. तिने त्याला पकडून ठेवलं आणि त्याला जेलची हवा खायला लावली. फक्त प्रश्न उपस्थित करुन, व्यवस्थेला दोष देऊन, कुणाकडे बोट दाखवून मुलींचा विनयभंग करणाऱ्यांचं प्रमाण कमी होणार नाहीये.. कारण त्यासाठी फक्त व्यवस्था बदलून चालत नाही तर मानसिकता बदलायला हवी.. ती कधी बदलेल माहित नाही.. पण मैत्रिणी आपण आपली मानसिकता नक्कीच बदलू शकतो.. आणि त्यासाठी सुरुवातीला आपला आवाज हेच आपल्या रक्षणाचं साधन आहे हे प्रत्येक मुलीला कळायला हवं..
मी एकटी मुलगी काय करणार असा विचार मूली करतात किंवा मग्ग असा प्रसंग घडीला तर हे रोजचच आहे म्हणून सोडून देतात, आणि आतल्या आत कुढत राहतात.. शरीराच्या ज्या भागाला तो किळसवाणा स्पर्श झालाय तो स्पर्श दिवसभर मनाला टोचत राहतो.. पण आपण बोलत नाही.. अशाने अशा विक्षिप्त लोकांच्या विकृत गोष्टींना आपण अप्रत्यक्षपणे खतपाणी घालत असतो..
आपल्याशी वाईट वागूनही आपण आवाज काढला नाही तर असा लिंगपिसाट दूसरं सावज शोधतो आणि मग्ग तिसरं... म्हणून अशा प्रवृत्तीला तिथल्या तिथे ठेचण्याची गरज असते. अशावेळी कुणी कृष्ण बनून आपल्या लज्जा रक्षणाला येईल असं होत नाही गं मैत्रिणी. त्यासाठी आधी तू किमान आवाज उठवायला हवास.. त्या विक्षिप्त माणसाला तुझ्या आवाजानेही घाम फुटेल, भीती वाटेल.. त्याला कळून चुकेल की आपण पकडले गेलोय आणि आता माझी खैर नाही.. तेव्हा मैत्रिणी उद्या तुझ्यावर असा प्रसंग ओढावला तर घाबरु नकोस; काळजात धडधडलं तरी फक्त तुझा आवाज वाढव, मग्ग बघ अंगात किती बळ येतंय!!
View More
























