>> अमेय चुंभळे, ABP माझा प्रतिनिधी
राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. आणि नव्या महायुती सरकारच्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेपासून त्याचा प्रत्यय येतोय.
त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अचानक हुक्की आली म्हणून केले जाणारे हे प्रयत्न नाहीयेत. त्यात एका प्रकारचं सातत्य आहे.
त्या प्रयत्नाचं ताजं उदाहरण म्हणजे गडचिरोलीतील नक्षलवादविरोधी धोरणांबद्दल सामनातून फडणवीसांचं केलेलं कौतुक. एवढंच नाही तर या अग्रलेखात फडणवीसांचा उल्लेख अनेकदा देवाभाऊ असा करण्यात आला आहे.
याआधीही अशा दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण वैयक्तिक कार्यक्रम आधीच ठरल्यानं ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला येणं जमणार नसल्याचं सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर काही दिवसांतच नागपुरात हिवाळी अधिवेशन झालं. त्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी स्वतः फडणवीसांच्या दालनात जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले, आणि सुरू झाल्या भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, अशा आशयाच्या चर्चा. या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया देखील सूचक होती. आम्ही काही शत्रू नाही, आणि आता आमच्या भेटी मोजू नका, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं.
मंडळी, राजकारणात सगळं काही सरळ-सोपं कधीच नसतं. एखाद्या शब्दामधून किंवा कृतीतून अप्रत्यक्ष संदेश असतात, इशारे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकेत असतात. आता हे संकेत कधी मित्रपक्षांना असतात तर कधी विरोधकांना.
नजीकच्या भूतकाळात एकमेकांवर जहाल टीका केलेले नेते अचानक एकमेकांचं कौतुक करू लागतात, तेव्हा तुमच्या आमच्यासारख्या राजकारणी नसलेल्यांना अनेक प्रश्न पडतात. कारण आपण आपले नैतिक निकष लावून त्याचं विश्लेषण करू पाहतो.
पण जे नेते प्रत्यक्षात हे सगळं करत असतात, त्यांच्यासाठी अनेकदा नैतिकता महत्त्वाची नसते. महत्त्वाचं असतं ते स्वतःचं हित. कारण जसं खुद्द देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना म्हणाले होते, राजकारणात जिवंत राहावं लागतं, तरच पुढचं राजकारण करता येतं.
राजकारणात अनेकदा भूतकाळातले राग-लोभ किंवा अप्रिय घटना विसराव्या लागतात. आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर वेळ पडल्यास अहंकार बाजूला ठेवून प्रतिस्पर्ध्याशी देखील संधान साधावं लागतं. प्राप्त परिस्थीत जर दोन प्रतिस्पर्धी असतील आणि एकाशीच लढणं शक्य असेल तर दुसऱ्याला आपल्या बाजूनं वळवावं लागतं. कारण आजच्या नेत्यांसाठी सत्ता सर्वात महत्त्वाची असते. मग या सत्तेसाठी नितीमत्ता, मूल्य, भूतकाळातल्या घोषणा, भूमिका सगळं काही त्याज्य असतं. कारण त्यांच्यासाठी सत्ता हेच ध्येय आणि सत्ता हेच अंतिम सत्य असतं.
उद्धव ठाकरेंच्या ताज्या कृतीत वरील सगळ्याचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजेच, ठाकरेंची किती इच्छा नसली तरी देवेंद्र फडणवीसांना जनतेनं मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलंय. ऑक्टोबर २०२९ पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्रिपदी असणार हे लक्षात ठेवूनच ठाकरेंना आपलं पुढचं राजकारण करावं लागणार आहे. आणि म्हणूनच, सामनातून फडणवीसांचं केलेलं कौतुक हा ठाकरेंच्या नव्या राजकारणाचा भाग आहे, असंच मानावं लागेल. कारण शिंदेंचं महत्त्व कमी करायचं असेल तर भाजपची मदत घेण्यावाचून ठाकरेंना पर्याय नाहीये. आता भाजप त्यांना मदत करेल असा आमचा अजिबात दावा नाही.
पण राजकारणात अशक्य असं काहीच नसतं. जे ९९ टक्के शक्य वाटत असतं ते क्षणार्धात अशक्य होतं, आणि जे निव्वळ अशक्य वाटतं, ते क्षणभरात होऊनही जातं. सरतेशेवटी, विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत बहुमत मिळाल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर सोंगट्यांची पुनर्मांडणी जरूर झाली असेल, खेळ मात्र संपलेला नाही. तो कधी संपतही नाही. वेळोवेळी प्रेक्षक बदलत राहतात एवढंच.
वाचा आणखी एक ब्लॉग :