>> अमेय चुंभळे, ABP माझा प्रतिनिधी
सनी देओलचा 'बॉर्डर' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी 9 वर्षांचा होतो. चित्रपटात जी लढाई दाखवली आहे, ती जैसलमेरजवळील लोंगेवाला इथं झाली. चित्रपट पाहिल्यापासून 'लोंगेवाला' हे नाव लक्षात राहिलं. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 6 डिसेंबर रोजी तिथं प्रत्यक्ष जाण्याचा योग आला. 'राजस्थान रोड ट्रिप'चं नियोजन करताना लौंगेवालाला जायचंच असं ठरवलं होतं.
जैसलमेरहून लोंगेवाला गाठण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक खुद्द शहरातून सुरू होतो, तर दुसरा सम गावातून जातो. समजवळ असलेल्या शेकडो टेंट्सपैकी एका टेंटमध्ये आमचा मुक्काम असल्यानं सम मार्गे लोंगेवाला इथं जाणं सोयीचं होतं. एकूण 112 किमी अंतर आहे. त्यातील 108 किमी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 70 आहे. आतापर्यंत जवळपास 2 लाख किमी गाडी चालवली आहे, त्यापैकी हा प्रवास माझ्यासाठी पहिल्या तीनमध्ये मोडतो. दोन्ही बाजूला वाळवंटाची पिवळी वाळू, आणि मधोमध काळा कुळकुळीत डांबरी रस्ता. कित्येक मिनिटं तर अशी जातात ज्यामध्ये एकही माणूस दिसत नाही. माणूसच काय, अन्य कुठला प्राणी देखील दिसत नाही. ओसाड वाळवंटात आपण अक्षरशः एकटे असतो.
जवळपास दीड तासात लोंगेवाला आलं. अतिशयोक्ती किंवा नाट्य म्हणून म्हणत नाही, मात्र तिथं पोहोचल्यावर आपला ऊर खरंच अभिमानानं भरून येतो. कारण 4 डिसेंबर 1971 च्या रात्री पाकिस्तानचे दोन हजार सैनिक जेव्हा लोंगेवालावर चाल करून आले, तेव्हा भारतील लष्कराच्या केवळ 120 जवानांनी अशी खिंड लढवली, की अवघ्या काही तासांत पाकिस्तानी लष्कर हतबल झालं. त्यांचे 200 हून अधिक जवान मारले गेले, 37 रणगाडे उद्ध्वस्त झाले आणि 500 हून अधिक वाहनं आपल्या लष्करानं नष्ट केली, किंवा पाकिस्तान्यांना सोडून जावी लागली. युद्ध स्मारकात ठेवलेला पाकिस्तानचा एम-4 शर्मन रणगाडा आजही भारताच्या निर्णायक विजयाची गाथा सांगतो. पंजाब रेजिमेंटची 23 वी बटालियन आणि त्यांच्या मदतीला असलेल्या बीएसएफच्या 14 व्या बटालियननं ही अनन्यसाधारण कामगिरी बजावली. या लढाईचं नेतृत्व करत होते मेजर कुलदीप सिंग चांदपुरी, ज्यांना नंतर वीर चक्र प्रदान करून गौरवण्यात आलं. 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओलनं मेजर चांदपुरी यांचीच भूमिका निभावली आहे.
लोंगेवाला युद्ध स्मारकात युद्धाची तपशीलवार माहिती दिली आहे. शहीद जवान आणि अधिकाऱ्यांचे पुतळे पाहिल्यावर मनाला चटका बसतो. देशाच्या संरक्षणासाठी अवघ्या विशीत किंवा तिशीत सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही, हा विचार सतत मनात येत राहतो.
लोंगेवाला युद्ध स्मारक भारतीय लष्कराच्या नियंत्रणात असल्यानं कारभार अतिशय शिस्तबद्ध आहे. अन्य पर्यटन स्थळांवर आढळून येणारा बेशिस्तपणा इथं नाही. मनात येईल तिथं वेड्यावाकड्या गाड्या पार्क केलेल्या दिसत नाहीत, कुणी कुठेही वेफर्स खातंय, कचरा कुठेही फेकतंय असं काहीच नाही. तिथल्या हवेतच शिस्त जाणवते.
इथं एकच कॅफे आहे. त्याचं नाव बॉर्डर कॅफे. इथं पुरी भाजी, छोले भटुरे आणि मॅगी मिळतं. त्यावरच भागवावं लागतं. लष्करी परिसर असल्यानं इथं रेस्टॉरंट्सची रांग नाही.
तनोट माताचं दर्शन
लोंगेवाला इथून राष्ट्रीय महामार्ग 70 हा पुढे तनोटला जातो. इथं तनोट माता देवीचं मंदिर आहे. भारताच्या वायव्य भागातील हे शेवटचं मंदिर. लोंगेवाला ते तनोट हे अंतर 38 किमी आहे.
1971 च्या युद्धात पाकिस्ताननं तनोटवर देखील हल्ला केला, मात्र एकही तोफगोळा मंदिरावर किंवा आसपासच्या परिसरात पडला नाही, असं सांगितलं जातं. बॉर्डर चित्रपटात देखील याचा उल्लेख आहे.
मंदिराच्या पार्किंगमध्ये नजर टाकली तेव्हा लक्षात आलं, तिथं MH पासिंगची आमची एकच गाडी होती. बाकी सर्व गाड्या या RJ किंवा GJ पासिंगच्या. तनोट मातेचं दर्शन घेऊन सम गावाकडे परतण्याचा प्रवास सुरू केला. वाटेत दोन ते तीन पेट्रोल पंप लागतात. त्यातील एका पंपवर गाडीला खुराक देऊन पुढे निघालो. इथं एक महत्त्वाची गोष्ट - रस्ता मोकळा आहे म्हणून वेग वाढवण्याचा मोह होतो. मात्र तो टाळला पाहिजे. कारण राजस्थानच्या अन्य महामार्गांप्रमाणं इथंही गायी, बैल अचानक मध्ये येतात, आणि आपला वेग जास्त असेल तर अपघात होण्याची दाट शक्यता असते. ओसाड वाळवंट असल्यानं शहराप्रमाणं आपात्कालीन मदत लगेच मिळत नाही. त्यामुळे इथं गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी, असं मी आवर्जून सुचवेन.
लोंगेवालाहून परतताना मनात अनेक भावना होत्या. मुंबईपासून जवळपास 1300 किमी अंतरावर असलेल्या, आणि भारत-पाक सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत गाडी नेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद प्रचंड होता. मात्र हे तर एक गंतव्यस्थान होतं, प्रवासात (आणि जीवनातही) आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव देखील होती.