BLOG : नाना पाटेकर : हरहुन्नरी, अजातशत्रू, अष्टपैलू!

BLOG : आज सकाळी बातमी वाचली—नाना पाटेकर गेले.
रोज आपल्यापर्यंत मृत्यूच्या अशा अनेक बातम्या येत असतात. दररोज कुणाच्या ना कुणाच्या निधनाची दुःखद वार्ता कानावर पडतच असते. पण आज ही बातमी वाचली आणि मनाला चटका लावून गेली. ऐकायला हा शब्द कितीही गुळगुळीत वाटत असला, तरी आज तो अगदी तंतोतंत खरा ठरतोय.
एखादी व्यक्ती जिच्याशी रक्ताचं किंवा नात्यागोत्याचं कोणतंही देणंघेणं नसतं, तरीही ती नकळतपणे आपल्या अंतःकरणाचा, हृदयाचा एक अविभाज्य भाग बनून जाते. या आभासी आणि दिखाऊ जगात राहूनही ज्यांनी आपला सच्चेपणा कसोशीने जपला, अशा मोजक्या लोकांमध्ये नानांचं नाव अग्रक्रमाने येतं.
नाना पाटेकर म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो आणि कानात घुमतो तो त्यांचा आवाज. अत्यंत बुलंद, कणखर, तितकाच मधुर आणि एक नादमय व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना.
मी त्यांच्या सिनेमांपेक्षा त्यांची भाषणं आणि मुलाखती अधिक ऐकल्या आहेत. त्यांची मुलाखत पाहताना प्रत्येक वेळी मनात एक तीव्र ओढ असायची की, या अवलियाला प्रत्यक्ष भेटता यावं. त्यांनी आपला सच्चेपणा जितक्या कसोशीने जपला, तितकी असोशी आणि तळमळ कदाचित माझ्या प्रयत्नांत कमी पडली असावी; म्हणूनच त्यांना भेटायची ही इच्छा शेवटी अपुरीच, राहूनच गेली.
आजच्या या मोजून-मापून चालणाऱ्या, आखीव-रेखीव आणि कॅलिब्रेटेड (calibrated) जगात नाना एक वेगळा अपवाद होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही कृत्रिम आव नव्हता. हे त्यांना न भेटताही सहज जाणवायचं. अतिशय उत्स्फूर्त, थेट, रोखठोक, प्रखर आणि त्याचवेळी मनाला भुरळ घालणारे अत्यंत लाघवी. या सर्व परस्परविरोधी आणि सुंदर विशेषणांचा यथार्थ समुच्चय म्हणजेच नाना पाटेकर! त्यांच्या एकंदर वावरण्यातच एक सहज प्रवाहीपण होतं.
त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा मूळ संदर्भ त्यांच्या संघर्षात, बालपणात आणि त्यांच्या आईमध्ये सापडतो. त्यांच्या वडिलांचा पूर्वी संपन्न व्यवसाय होता, घरामध्ये श्रीमंती आणि सुबत्ता होती. पण अचानक परिस्थितीचे ग्रह फिरले आणि संपन्नतेतून हे कुटुंब एका क्षणात संघर्षाच्या आणि विपन्नतेच्या दरीत फेकलं गेलं.
अशा बिकट काळात लहान वयातच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नानांची धडपड सुरू झाली. सिनेमांची पोस्टर्स रंगवण्यापासून ते इतर मिळेल त्या कामांतून त्यांचा हा खडतर प्रवास सुरू झाला. पण हे सगळं करताना आपला मुलगा कुठल्याही वाईट मार्गाला लागू नये, भरकटू नये, यासाठी त्यांची आई सतत दक्ष असायची. आईच्या या काळजीचे भान नानांनाही पुरेपूर होते.
पैशांअभावी आणि योग्य उपचारांच्या अभावी जेव्हा महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्यांच्या वडिलांचा अंत झाला, तेव्हा वडील गेल्याच्या दुःखापेक्षाही त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळू शकले नाहीत आणि आपण त्यांना वाचवू शकलो नाही, या गोष्टीची टोचणी नानांच्या मनात कायम सलत राहिली.
अभिनयाचा विचार केला, तर 'तिरंगा' चित्रपटातला शिवाजीराव वाघळे असो, 'क्रांतिवीर'मधली व्यवस्था हलवून सोडणारी व्यक्तिरेखा असो, 'गुलाम-ए-मुस्तफा', 'अब तक छप्पन', किंवा 'थोडासा रूमानी हो जायें'मधली अभिजात भूमिका असो—त्यांच्या भूमिकांमधली ती अस्वस्थता त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यात आणि मुलाखतींमध्येही स्पष्ट जाणवायची. दुसरीकडे 'वेलकम' चित्रपटातला 'उदय शेट्टी' त्यांनी आपल्या खास आणि वेगळ्याच शैलीत मांडून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
नानांकडे केवळ अभिनयाचे कसब, प्रतिभा किंवा तंत्र नव्हते, तर त्यांची स्वतःची एक ठाम सामाजिक आणि वैचारिक भूमिका होती. माणसाने कसं जगावं, समाजात वावरताना संवेदनशीलता, हळवेपणा आणि कणव कशी निरंतर जपावी, याचं नाना हे एक ज्वलंत उदाहरण होते.
'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी केवळ सामाजिक कार्यच केले नाही, तर स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि साधेपणा या मूल्यांविषयी ते नेहमी परखडपणे बोलले. मराठी भाषेविषयीची आत्मीयता असो किंवा समाजातल्या बोचणाऱ्या विसंगतींवरची त्यांची प्रखर टिप्पणी असो—स्वतः एक सेलिब्रिटी असूनही कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता, समाजाच्या एकंदर स्वास्थ्यासाठी ते अविरतपणे व्यक्त होत राहिले. त्यांनी कधीही कोणाच्या टीकेची तमा बाळगली नाही, कारण त्यांची वैचारिक बैठक अतिशय स्वच्छ आणि सुस्पष्ट होती.
आपल्या आईवर त्यांचं नितांत प्रेम होतं. त्यांच्या मातोश्री दीर्घायुषी ठरल्या, वयाच्या 90-92 व्या वर्षापर्यंत जगल्या. त्या माऊलीनेच आपल्या सर्वांना एक असा कणखर, समर्थ आणि संवेदनशील मुलगा दिला, ज्याच्या मनात समाजाविषयी अथांग आस्था, कामाप्रती संपूर्ण समर्पण आणि प्रत्येक माणसाविषयी निखळ आपुलकी होती.
– ओंकार अंजली देवेंद्र वैद्य
ट्रेंडिंग न्यूज






















