आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही केलेल्या निवेदनाचा सूर बघितला तर सर्वांच्या लक्षात आलं असेल कि त्या दोघांनी या जागतिक आरोग्य आणीबाणीच्या काळात नागरिकांकडून साथ देण्याची अपेक्षा व्यक्त केलीय. हे युद्ध जिंकायचं असेल तर तुमची साथ महत्वाची आहे असे बोलून शेवटी 'बॉल' नागरिकांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळं यापुढं कसं जगायचं हे ठरवण्याची वेळ नक्कीच आली आहे. मुळात तुम्ही अशा अमुक पद्धतीने वागा ही सांगण्याची वेळ का आली? याचा पण सारासार पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. एखाद्या वेळी जेव्हा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला जर काही आपल्या हिताच्या चार गोष्टी सांगत असतील तर त्यामागे नक्कीच एक प्रामाणिक हेतू असतो, हे आपल्याला इकडे विसरून चालणार नाही.

जगभरात कोरोनाचा (कोविड-19) फैलाव रोखण्याकरिता सर्वच देश आपापल्या पद्धतीने पावलं उचलत आहे. आपल्या देशात सुद्धा योग्य ती पावलं उचलून या महामारीला आळा घालण्याकरिता येत्या रविवारी जनता संचारबंदी करण्याचे आवाहन खुद्द पंतप्रधानांनी केले आहे. यामुळे एक तर कोरोनाबद्दलच गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येईल आणि जनजागृती तर होईलच. परंतु या विषाणूचा त्या काळात कुणालाच प्रादुर्भाव होणार नाही. प्रत्येक जण हा आपल्या घरी असेल फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, हे एक प्रकारचं पूर्ण देशभरातील 'सेल्फ क्वारंटाईन' म्हणावं लागेल. या मागचा उद्देश नक्कीच चांगला आहे. आता त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे या देशातील प्रत्येक नागरिकाने ठरवायचं आहे.

जगात सध्या काही देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाउनसारखा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे संबंध देशात किंवा संबंधित राज्यात, शहरात अनिश्चित काळाकरता संचारबंदी घोषित केली जाते. त्यामुळे निश्चितच काही नागरिकांना त्यांचा त्रास होतो परंतु त्याशिवाय कोणताच पर्याय त्यांच्याकडे उरलेला नसतो. अजून तरी आपल्याकडे परिस्थिती ही नियंत्रणात आहे. फार कमी मोजक्या स्थानिक लोकांनाच याची लागण झालीय. अन्य जे काही रुग्ण कोरोना बाधित आहेत त्यांना परदेशातून प्रवास करून आल्यामुळे त्याची लागण झाली आहे. या सगळ्या नियंत्रित परिस्थितीचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते जातं दक्ष प्रशासनाला. अविरतपणे रुग्ण सेवा देणारे सर्वच रुग्णायलशी संबंधित असणारा संपूर्ण कर्मचारीवृंद त्यात डॉक्टर्सही आलेच. पोलीस प्रशासन शिवाय अत्यावश्यक सेवा देणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना हे श्रेय द्यावं लागेल.

आता प्रश्न उरला आहे तो आपण सर्वांनी जबाबदार नागरिक होऊन भूमिका बजावण्याचा. वर्क फ्रॉम होम करण्याची संधी तुम्हाला मिळाली असेल तर त्याचं व्यवस्थित पालन करा. काही जणांची कार्यालये बंद करण्यात आली असून त्यांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यांनी घरी बसून आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या. नियमांचं पालन करून ज्येष्ठ नागरिकांना मदत करा हीच सध्याच्या काळातील देशसेवा आहे. किमान नागरिकांचा संपर्क राहील असे आपले कृत्य अपेक्षित आहे. काही खाजगी कंपन्याची कार्यालयं अजूनही चालूच आहेत, शक्य झाल्यास त्यांनी काही काळापुरती बंद ठेवावी. शासनाचा कायद्याचा बडगा उगारण्याआधी आपणच स्वतःहून या संपूर्ण प्रक्रियेत देशासाठी काही करू शकलो तर निश्चितच ते भूषणावह ठरु शकेल.

कोरोनाचं आपल्या देशावर आलेलं हे सामाजिक संकट आहे, त्यामुळे या संकटाशी मुकाबला करताना कुठल्याही पद्धतीची राजकीय कुरघोडी न करता सर्वांनीच एकदिलाने याला सामोरं गेलं पाहिजे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव हा कुठलंही जात धर्म पंथ बघून होत नाही. शिवाय यामध्ये गरीब श्रीमंत असा भेद नसतो. त्यामुळे घाबरुन न जाता जागरूक राहण्याची हिच ती वेळ.

या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत. 

हे देखील आवर्जून वाचा

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ? 

BLOG | आरोग्यसेवेतून राष्ट्रसेवाच...