‪कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव झाला असताना आता त्याचा थेट महाराष्ट्रात शिरकाव झाला असून तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्णांना सध्या महाराष्ट्रातील विविध शहरातील रुग्णालयात ऍडमिट कऱण्यात आलंय. ‬


‪मात्र अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडला असेल कि काही माध्यमांमध्ये काही ठिकाणी काही बातम्यांमध्ये विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये कोरोना व्हायरस ऐवजी कोविड-19 ने रुग्ण बाधित अशा बातम्या येत आहे. माझ्या एका मित्राने विचारलं हे दोन वेगळे व्हायरस आहेत का? व्हायरस याला मराठीमध्ये विषाणू असे संबोधतात.‬

‪तर त्याचं असं आहे कि, याबद्दल ‬महाराष्ट्र आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात कि, कोरोना नावाचा व्हायरस यापूर्वीही अस्तित्वात होताच. मात्र यावेळी चीन देशातील वूहान शहरात जो करोना व्हायरस आढळून आला आह, तो मात्र यापूर्वी आढळलेल्या करोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. या व्हायरसची जनुकीय रचना इतर कोणत्याही पूर्वीच्या करोना व्हायरस पेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे. त्यामुळे या व्हायरसला नवीन (नोवेल) कोरोना-2019 (nCOVID-2019) असं नाव देण्यात आलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन COVID -19 (कोविड-19) असं नाव दिले आहे.  थोडक्यात CO-कोरोना V - व्हायरस I -इंफेक्शयस D -डीसीस. 2019. त्यामुळे कुणीही गोंधळून जायाचं कारण नाही. आपण फक्त सतर्क राहून काळजी घ्यायची आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, गरोदर महिला, लहान मुले, वरिष्ठ नागरिक तसेच ज्यांना आधीपासून मधुमेह, ब्लडप्रेशर, किडनी, लिव्हरचे आजार, त्याचबरोबर ज्यांच अवयव प्रत्यारोपण झाले आहे अशा व्यक्तींनी या काळात जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. कारण अशा व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वसाधारणपणे इतरांच्या तुलनेत कमी असते. अशा व्यक्तींनी या काळात चांगला आहार करणं, शक्यतो गर्दीची ठिकाणं जाणं टाळावं. पण पर्याय नसेल तेव्हा मात्र रुमालाचा वापर करून स्वतःच संरक्षण करावे. मनात कुठलीही भीती न बाळगता जगा, पण काळजी घ्या. सध्याच्या घडीला राज्यातील सर्व रुग्ण चांगले आहेत. ‬

आपली सर्व आरोग्य व्यवस्था यावर लक्ष ठेवून आहे. आपणही या काळात त्यानां सहकार्य केल पाहिजे.‬ राज्यातील आरोग्य विभाग रात्र दिवस काम करीत आहे. प्रशासन या आजारा संदर्भातील माहिती आपल्याला मीडियाच्या माध्यमातुन देत आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका.

राज्याच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेडस उपलब्ध आहेत.

- संतोष आंधळे वरिष्ठ संपादक माय मेडिकल मंत्रा