संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा
देशाची आर्थिंक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरांमध्ये अजूनही कोरोनाला अनेकजण हलक्यामध्ये घेताना दिसतायंत. राज्य शासन कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव थांबवण्याकरिता एका बाजूला युद्धपातळीवर पावलं उचलत असताना नागरिकांकडून मात्र हवा तास प्रतिसाद मिळत नाहीये. नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे कि याचं भान काही जणांना राहिलेलं नाही. कोरोनाकडे संधी न बघता देशावर, राज्यावर आपल्या शहरांवर आलेलं मोठा संकट आहे. याची तुम्हाला खात्री पटवण्याकरिता अजून तुम्ही कशाची वाट पाहत आहात. प्रशासन जर प्रतिबंधात्मक उपाय करून येऊ घातलेल्या मोठ्या राक्षसी संकटाला आळा घालण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला साथ द्यायची सोडून बिनदिक्तपणे हिंडण्या-फिरण्यावर आपण आवर घातला पाहिजे. ही साधी गोष्ट पण काळात नाही का? सुट्टी मिळाली असेल तर घरी बसा. काही दिवसाचा तर प्रश्न आहे. जर सगळ्यांनी साथ दिली तर, नंतर आहोतच आपण आपलं सुखकर आयुष्य जगायला मोकळे. काही दिवस मित्रासोबत हिंडण्यापेक्षा घरी बसलात तरी ती 'समाजसेवा' होईल, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
अनेकांनी आतपर्यंत सांगितलं असेलंच, शासनाने दिलेली सुट्टी ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिलेली आहे, अनावश्यक एकाच ठिकाणावरील गर्दी टाळावी हा त्यामागील शुद्ध हेतू आहे. आपल्याला आजही अनेकजण विशेषतः मुंबई मध्ये ट्रेन मधून फिरताना दिसतायत, मारिनलाईन्स, गेटवे ऑफ इंडिया, सी एस टी, चर्चगेट येथे अजूनही दोस्ती-यारानाचा गोतावळा दिसतोय, याला त्वरित अटकाव करणे गरजेचे आहे.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना खरं तर त्यांना आपण सलाम केला पाहिजे. आपल्या सर्व महत्वाचा सेवा व्यवस्थित मिळाव्यात म्हणून कोणतीही तक्रार न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. राज्याचं पोलीस दल त्यांचं काम करीत आहे, त्यांना शक्यतो सहकार्य करा. जर ते तुह्माला विनंतीपूर्वक सांगत असतील की गर्दी टाळा तर कृपया त्यांचं ऐका, काही गोष्टीचं आपल्याला वाईट वाटत असलं तरी आजच्या काळात ते आपल्याच हिताचं आहे.
BLOG | आरोग्यसेवेतून राष्ट्रसेवाच...
राज्याचा आरोग्य विभाग सक्षमपणे आपलं काम करीत आहे, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावलं उचलीत आहे. अनेक मोठ्या डॉक्टर्सनी आपलं रुटीन 'ओपीडी' रद्द करून फक्त अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यावर भर दिला आहे. परंतु त्यांना या विषाणूचे परिणाम आपल्यापेक्षा जास्त व्यवस्थित माहित असल्याने केवळ गर्दी टाळण्याकरिता, लोकांचा एकमेकांसोबत येणार संपर्क टाळावा म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून 'ओपीडी' रद्द केल्या आहेत. ते शांतपणे आपले काम करीत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलेही डॉकटर्स फिरायला गेलेले नाहीत किंवा दवाखाना बंद करून घरी बसलेले नाहीत, नित्यनियमाने ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली काम करीत आहेत. आपलं आरोग्य चांगल राहावं म्हणून, सर्व डॉक्टर्स मंडळी आपली जीवाची परीकाष्टा करीत आहेत.
राज्यातील कोविड -19 बाधितांची संख्या 47 वर पोहचली असून एका व्यक्तीचा या विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे आणि ती याच प्रकारे नियंत्रित राहावी यासाठी शासन विविध उपाय योजना करीत आहे. नुकतंच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंनधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी याची परिस्थिती नियंत्रण करण्याबाबत शासन आदेश काढण्यात आले आहे.
समाजाच्या विविध स्तरातून मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल बंदची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा यापूर्वीच भीती व्यक्त केली आहे, जर गर्दी अशीच वाढत राहिली. तर मात्र लोकल बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अनेक देशामध्ये जिथे कोविड - 19 विषाणूचा संसर्ग झाला आहे, त्या देशांत लॉक डाऊन सारखा पर्याय अवलंबला आहे.
आपल्यावर अशी वेळ येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आताच खबरदारीचा उपाय म्हणून जागरूक राहा. उगाच कोरोना वैगरे असं काही नसतं, अशा गमजा मारत बोंबलत हिंडू नका. लॉक डाऊन प्रकारचा अवलंब करणे तशी ही अवघड आणी जाचक प्रक्रिया आहे. परंतु, सगळ्यात नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. जनतेच्या आरोग्यच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे, त्यासाठी ते कोणतेही अवघड पाऊल उचलू शकतात. तुम्ही साथ दिली नाही तर त्यांच्यावर सिटी लॉक डाउन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.