Blog : वाचकहो, तर मागच्या भागात तुम्ही वाचलं असेलच की आढळराव पाटलांच्या घरी आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही आढळराव पाटलांच्या केबिनमध्ये गेलो, त्यांना आमच्या कार्यक्रमाचा विषय समजावून सांगितला आणि त्यानंतर आढळराव एका पायावर शूटसाठी तयार झाले. त्यांना आम्ही बाहेर घेऊन आलो, पण तितक्यात त्यांनी आमची जय-विरुची बाईक बघितली आणि आढळराव जरा बुचकळ्यातच पडले... "मी यावर बसायचंय?" मी आणि संकेतनं म्हटलं, हो... त्यावर आढळराव जरा विचार करुन म्हणाले, नाही.. एक काम करा, ऊन भरपूर आहे.. आपण माझ्या कारमधून शूट करू...त्यांना विनवणी करेपर्यंत वाजले 12. आता ऊन डोक्यावर चढलं होतं, त्यात एपिसोड आजच्या आज टीव्हीवर जाणं खूप महत्त्वाचं होतं. आढळरावांच्या हो ला हो केलं आणि त्यांना आम्ही होकार दिला, म्हटलं ठीक आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला आवाज दिला - 'गाडी काढ रे...' आणि त्यानंतर पांढरी शुभ्र फॉर्च्युनर आमच्या समोर येऊन थांबली. आम्ही दोघांनी आढळरावांना मागच्या सीटवर दोघांच्यामध्ये बसण्यास सांगितलं. ते तयारही झाले. पुढच्या सीटवर आमचे कॅमेरामन अजित कदमने कॅमेऱ्याची फ्रेम सेट केली आणि आमचं शूट सुरु झालं. 


आढळरावांचं घर, शाळा आणि अलिशान प्रॉपर्टी...


आम्ही आढळरावांसोबत मुलाखतीला सुरुवात केली. बंगल्यातून बाहेर पडल्यावर त्यांच्या घराशेजारीच व्हाईट हाऊससारखी प्रतिकृती आहे. तिथून बाहेर पडल्यावर ते खेडं आहे, असं आम्हाला जाणवलंच नाही. त्यानंतर आढळरावांनी आम्हाला त्यांनी उभ्या केलेल्या शाळेतून आणि बागेतून एक फेरफटका मारुन आणलं. तिथून या माणसाचं व्हिजन काय असेल याची प्रचिती आम्हाला आली. त्यानंतर आढळराव आम्हाला घेऊन गेले ते म्हणजे त्यांनी ग्रामीण भागात उभं केलेलं स्टेडीयम पहायला. तिथे गेल्यावर आम्ही कोणत्यातरी मोठ्या स्टेडीयमवर आलोय याचा भासच आम्हाला झाला. तिथेही आमच्या हलक्या फुलक्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर विषय निघाला बैलगाडा शर्यतीचा. त्यावेळी आढळराव म्हणाले, मी खासदार असताना मी बैलगाडा शर्यतीसाठी झटलो... हा मुद्दा ग्रामीण भागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं.


शूट संपलं आणि आढळरावांची उमेदवारी फिक्स...


शूट झालं आणि डेस्कवरुन फोन आला की,  अजित पवारांकडून शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली जाणार, असं दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत घोषणा झालीये. सिद्ध्या पटकन आढळरावांचा वन टू वन कर... वन टू वन म्हणजे एक छोटी मुलाखत. तातडीनं आढळरावांना मी सांगितलं, त्यावर आढळरावांना याबद्दलची काही कल्पनाच नव्हती आणि त्यामुळे त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांना फोन लावला आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर ते आढळरावांशी बोलले आणि आढळराव तयार झाले. त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर आढळरावांसोबत एक वन टू वन केला आणि ऑफिसला पाठवून दिला. सगळ्या चॅनलवर बातमी जायच्या आत एबीपी माझावर आढळरावांची उमेदवारी मिळाल्यानंतर एक्स्क्लूझिव्ह प्रतिक्रिया होती.


मंचरचं मटण आणि पुन्हा पुण्यात मुक्काम


शूट संपल्यावर सगळं फिड मुंबईला पाठवल्यावर पोटात भुकेनं पार जीव सोडला होता. म्हटलं जेवायला तर हवंय आणि म्हणून मंचरचं फेमस असं 'हॉटेल महाराणा'मध्ये जाऊन आडवा हात मारला. जठरअग्नी शांत झाल्यावर पुन्हा पुण्याच्या दिशेनं निघालो. तिकडे आमचा आधार थांबला होता. आधार म्हणजे विनोद घाटगे. विनोद सरांचे सारखे फोन्स सुरु होते. कुठवर आलात? लवकर, या असं म्हणत म्हणत आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता पुण्यात पोहोचलो. दुसऱ्या दिवशी बारामतीला शूट करायचं होतं, त्यामुळे आम्हाला राहण्यास पुणेच फायद्याचं ठरणार होतं. 


पुणे काय पाठ सोडेना... अन् बारामतीचं काय जुळेना...


रात्री हॉटेलवर आल्यावर उद्याच्या एपिसोडचं टेन्शन सतावत होतं. विनोद सर जरी असले तरी उमेदवाराचा काय मेळ लागत नव्हता. बारामतीत कुठं शूट करायचं? हा विचार करत असताना सुप्रिया सुळेंचं तळ्यात मळ्यात सुरु होतं. त्यांची वेळ मुलाखतीसाठी साधणं आम्हाला फार अवघड जात होतं. त्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत होत्या, त्यांच्या पी.ए.शी आमचा संपर्क होत होता, मात्र तो तेवढ्यापुरताच... पण त्यावेळी एक नाव अपक्ष लढण्यासाठी जोरदार चर्चेत होतं, ते म्हणजे- विजय शिवतारे यांचं. 


शिवतारेंचंही जमेना


पुढे आम्ही लगेच विजय शिवतारेंना कॉल केला, ते लगेच तयारही झाले. त्यांनी पुण्याच्या सर्किट हाऊसला यायला सांगितलं, पण तिथे शिवतारे भेटले नाही. मग आम्ही आमचा बारामतीचा रिपोर्टर जयदीप भगतला फोन लावला. त्याने सांगितलं, सासवडमधअये शिवतारेंचा कार्यकर्ता मेळावा आहे, तिथे या. कदाचित तिथे तुम्हाला ते भेटतील. आम्ही क्षणाचाही विलंब न करता सासवड गाठलं, पण वाटेतच आमच्या पदरी निराशा पडली. शिवतारे अचानक आजारी पडल्यानं त्यांनी कार्यकर्ता मेळावाही रद्द करुन टाकला होता. झाली का पंचायत... शिवतारेंची भेट काही झालीच नाही आणि आम्ही आमचं हे दुखणं घेऊन सासवडमध्ये पोहोचलो. सासवडमध्ये तर आलो, पण आता करायचं काय? उमेदवाराचा पत्ता नाही... मग विनोद सरांनी सांगितलं, पोरांनो! आजचा एपिसोड फक्त बाईट्सवर काढायचा...


ताई विरुद्ध वहिनी, कोण मारणार बाजी?


बारामती लोकसभेचा निकाल काय लागलाय हे सगळ्यांना माहितेय. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. पण आम्ही जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा आम्हाला समजलं, लोकांना त्यांची कामं करणारा लोकप्रतिनिधी तिथं हवाय. त्यामुळे मतदार राजा आमच्याशी मुक्तपणे बोलत होता. आम्ही त्याचा कौल ऐकून घेतला, तिथेच सुप्रिया सुळेंचा विजय फिक्स असल्याती प्रचिती झाली आणि त्यानंतर पुढे आम्ही गाठलं सातारा...


साताऱ्याला काय झालं? ते आता पुढच्या भागात...


हे ही वाचा :


मिळालेली संधी, आव्हानांचा डोंगर अन् पेललेलं शिवधनुष्य, अशी झाली सुरुवात 'जय-वीरु'च्या प्रवासाची


धंगेकरांच्या मुलाखतीसाठी पळापळ अन् मुंबईकरांचा पुणेरी पाहुणचार 


जय विरुचे पडद्यामागचे शोले! दिवस तिसरा; एपिसोडचं टेन्शन, साक्षात दुर्गामाताच आली मदतीला!