अख्या जगभरात कोरोनाचा (कोविड -19) संसर्ग टाळण्याकरिता सर्वच पातळीवर प्रत्येक देशातील प्रशासन प्रतिबंधात्मक पावलं उचलीत आहे. परंतु ज्या पद्धतीचं वातावरण सध्या तयार झालंय त्यामुळे जनसामान्यामध्ये 'कोरो-एन्झायटी' ची भीती निर्माण झाली आहे. साधा खोकला झाला तरी कोरोनाचाच विचार बहुतांशाच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही.


व्हॉटस ऍप आणि फेसबुक प्रामुख्याने या दोन सामाजिक माध्यमातून ज्या पद्धतीने कोरोना विषयाची जी चुकीची माहिती प्रसारित होत आहे ती थांबावंण फार गरजेचं आहे. विशेष म्हणजे ही खरी तर आपल्या नागरिकांचीच जबाबदारी आहे . कोरोनाच्या 'इपिडेमिक' पेक्षा लोकांचा 'इन्फोडेमिक' हानीकारक आहे. या सगळया प्रकारची गंभीर दखल घेऊन काही दिवसापूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांना पत्र लिहून अशा चुकीच्या माहिती प्रसारित करणाऱ्यवर कडक कारवाई करावे असे सूचित केले होते.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शुक्रवार पर्यंत 52 होता, परंतु शनिवारी हा आकडा 63 पर्यंत गेलेला आपणस आढळून आला आहे. याचा अर्थ रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे, यापैकी बरेच रुग्ण हे परदेशातून आलेले आहे. भारताच्या कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येच्या यादीत महाराष्ट्र सर्वात वर आहे.

या सर्व भीतीदायक वातावरणात इकडे तिकडे चोहिकडे, फक्त आणि फक्त सर्वत्र फक्त कोरोनाचीच चर्चा आहे. घरात टी.व्ही लावला तरी कोरोनाच्याचं बातम्यांनी धुमाकूळ घातलाय. त्या बातम्या देणं सुद्धा हि काळाची गरज आहे हे आपणास विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे व्हाट्स अँप आणि फेसबुक वर लोक कोरोनाच्याचं माहितीची देवाण-घेवाण करताना आपणास दिसतंयात. काही जणांना तर सध्या आपण 'कोरोना वर्ल्ड' मध्ये जगत असल्याचा भास होत आहे.

कोरोनाच्या या हाहा:काराने सर्वत्र जगभरात धुमाकूळ घातला असताना आरोग्यतज्ज्ञाच्या मते अजूनही आपली परिस्थिती नियंत्रणात आहे. जगात लोकसंख्येच्या क्रमवारीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्या लोकसंख्येची तुलना बघता आज तरी आपली परिस्थिती अजूनही चांगली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, मानसिक आरोग्यसंदर्भात विशेष अशी माहिती प्रसिद्ध केली आहे, त्याचप्रमाणे काही सूचनाही त्यांनी आपल्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध केल्या आहेत. आपल्या राज्याचीही आरोग्य व्यवस्था सर्वत्र जोरदार जनजागृती विविध मोहीम राबवीत आहे.

मुंबईतील मनोसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात कि, "या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसापासून ज्यांना अगोदर पासून मानसिक आजार आहे, त्यांना कोरोनाच्या आजाराची जास्त भीत वाटत आहे.या काळात सर्वानीच मानसिक आरोग्य उत्तम राखलं पाहिजे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना अँक्झायटी डिसॉईडर म्हणजेच अतिशय बेचैन होण्याचा आजार आहे, असे रुग्ण कायम काळजी करत असतात. त्यांना कायम आपल्या आरोग्याविषयी काळजी वाटत राहते, तसेच आपल्या कुटुंबियातील लोकांनाही हा आजार झाला आहे. त्यामुळे काहीतरी वाईट घडणार असच सतत वाटत राहत. अशा लोकांना समुपदेशन करून फारसा फायदा होत नाही, त्यांना त्यांच्या आजाराचं गांभीर्य बघून काही वेळा औषध दयावी लागतात."

डॉ. मुंदडा पुढे असेही सांगतात कि, काही जणांना सीडी (ऑब्सेसिव्ह कंप्लसिव्ह डिसऑर्डर) म्हणजेच एखादी कृती वारंवार करावंसं वाटत राहत. हा आजार असणाऱ्या रुग्णांना या कोरोना विषाणूचा एवढा धसका घेतलाय की, या आजाराचा संसर्ग आपल्याला होऊ नये याकरिता हे रुग्ण दिवसभर आपले हात धूत राहतात. काही जण तर काही वेळेच्या फरकाने सॅनीटायझर वापर करतानाच्या केसेस क्लिनिक मध्ये येत आहे. यापेक्षा सर्वसामान्यही लोकांमध्ये ह्या आजाराने भीती पसरली आहे. अनेकांना कोणतीही लक्षणं नसताना ह्या विषाणूचा आपल्याला प्रादुर्भाव होईल कि याची भीती वाटत आहे. पण कालांतराने ही भीती कमी होत असते अशा लोकांना कोणत्याही औषधाची गरज नसते.

नागरिकांचं मानसिक आरोग्य उत्तम असणं ही काळाची गरज आहे. तुमहाला केव्हाही मनात धडधड होणे, भीती वाटत असल्यास घरातील, परिचययातील, मित्रांशी बोला. जर तुम्हालाही यासंदर्भात कुणी माहिती विचारात असेल तर शक्यतो त्याच्याशी बोला. जर तुम्हाला त्याचं गांभीर्य अधिक वाटत असेल तर त्यांस डॉक्टर्स कडे जाण्याचा सल्ला द्या. मानसिक आजारामध्ये कुटुंबीयांची साथ फार मोलाची असते, त्यांच्या आधारवर रुग्ण अशा आजारावर मात करण्यास यशस्वी होत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पाहावयास मिळतात.

या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत. 

हे देखील आवर्जून वाचा

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ? 

BLOG | आरोग्यसेवेतून राष्ट्रसेवाच...