कोविड -19 म्हणजे कोरोना हा शब्द संपूर्ण देशासाठी आता जणू रोजच्या चर्चेतला अविभाज्य भाग झालाय, कोरोना या विषयवार दिवसभरात एकदाही चर्चा होणार नाही असा एकही दिवस नाही. मानवाची संपूर्ण जीवनशैली बदलून टाकणाऱ्या या कोरोनाचा थैमान थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे. 1 मे नंतर तर या कोरोनाने आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. आता तर 40 दिवसाच्या दोन लॉकडाऊन संपून तिसरा लॉकडाऊन सुरू होऊन काही दिवस उलटले असले तरी कोरोना मात्र काही पाठ सोडत नाही. विशेष म्हणजे संपूर्ण विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई शहरात दिवसागणिक हजाराच्या संख्येने रुग्ण संख्या वाढीस सुरवात झाली आहे. आरोग्य यंत्रणा त्याचा मुकाबला करण्यास सज्ज असून ते त्यांचं काम व्यस्थित पार पडत आहे, मात्र नागरिकांनी आता जास्त काळजी घेऊन सावध राहिलं पाहिजे. मे महिना हा निर्णायक महिना ठरण्याची शक्यता असून बहुतांश आरोग्य तज्ज्ञांनी या काळात रुग्ण संख्या वाढणार असल्याचे अनुमान या अगोदरच व्यक्त केले आहे.
राज्य शासन युद्धपातळीवर काम करत आहे. रुग्ण संख्या अचानक वाढली तर बेडची संख्या अपुरी पडता काम नये यासाठी ते रात्रं-दिवस काम करीत आहे. मुंबईतील विविध मोक्याच्या जागा शोधण्यात आल्या असून तेथे 15 दिवसात 20 हजार बेड्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील 20 टक्के अतिदक्षता विभागातील बेड आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण विभागाशी संबंधित काही रुग्णालये मुंबई शहारत आहे, या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बेड उपलब्ध करून घेण्याची परवानगी मिळाली आहे. एकंदर काय तर आता नागरिकांनी ज्या प्रमाणे शासनाला सहकार्य केले आहे त्याप्रमाणे अजून काही दिवस सहकार्य केल्यास कोरोनावर विजय मिळविणे शक्य होणार आहे. कोरोना समूळ नष्ट होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहित आहे मात्र वाढणारी रुग्ण संख्या आणि बळीची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होणे अपेक्षित आहे. टाळेबंदीमुळे एप्रिल महिन्यात कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात राहिली आहे. मे महिन्यात सुद्धा अशाच पद्धतीने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वरळी-कोळीवाड्यातील कोरोनाची साथ थांबविण्यास बऱ्यापैकी आरोग्ययंत्रणेला यश प्राप्त झालं आहे. आता पुन्हा एकदा मिशन धारावी करत आरोग्य यंत्रणेने या भागात कंबर कसली असून लोकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. या संसर्गाचा विळखा मुंबई मध्ये हळू-हळू घट्ट होत आहे. मात्र या सगळ्याचा मुकाबला करण्यासाठी खासगी व्यव्यस्थेतील डॉक्टरांची मदत प्रशासन घेत आहे.
राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, सांगतात की, "आरोग्य यंत्रणा त्यांचा काम व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. टेस्टिंगची संख्या वाढविण्याबरोबर सर्वेक्षणाच्या कामावर अधिक भर दिला जात आहे. आरोग्य कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन रुग्ण शोधून काढण्याची काम करीत आहेत. रुग्ण संख्या वाढत असली तरी नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. सर्व रुग्णांना उपचार मिळतील अशी व्यवस्था मुंबई शहरात करण्यात आली असून उपचार करून बरे होणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अति गंभीर रुग्णांनाही या भंयकर आजारातून बाहेर काढण्यास आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त होत आहे ही खरी तर दिलासादायक बाब आहे. हत्ती गेला आणि शेपूट राहिली सध्या अशी परिस्थती आहे. लवकर या महाकाय संकटातून आपण सर्व लवकरच बाहेर पडू अशी मला आशा आहे".
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांना कोविड रुग्णालयात अपुऱ्या क्षमतेमुळे दाखल करुन घेतले जात नाही. मात्र भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणविरहित नागरिकांना जर शक्य असेल आणि ज्यांची घरातच स्वतंत्र शौचालय व खोली अशी व्यवस्था असेल तर वैद्यकीय सल्ल्यानुसार ते अलगीकरण करून घरात राहू शकतात. ज्यांना शक्य नाही त्यांना मात्र संस्थानात्मक अलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे असते. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे गरजेचे आहे, उगाच अर्धवट माहिती वरून संभ्रम निर्माण करून नये. काही गरज लागल्यास त्यांनी महापलिकने दिलेल्या हेल्पलाईन वर संपर्क साधून योग्य ती माहिती घ्यावी.
कोविड -19 च्या रुग्णाप्रमाणे कोविड -19 शिवाय अन्य रुग्णाची हेळसांड होऊ नये त्यांना व्यवस्थितपणे उपचार मिळावेत म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि महापालिकेतील सर्व रुग्णालयातील रिक्त पदे भरून काढण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी देखील घेतली आहे. नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे की, मे महिना हा सवेंदनशील असून लॉकडाउनचे निकष व्यस्थितपणे पाळले पाहिजे. नागरिकांची एखादी चूक मोठी महागात पडू शकते. अनेक लोकांना वाटत आहे की, लॉकडाऊन होऊन एवढा मोठा काळ लोटला आहे म्हणजे कोरोनाचा आजार संपुष्टात आला आहे. ग्रीन झोन कायमस्वरुपी ग्रीन कसा राहील याकडे नागरिकांनी भर दिला पाहिजे. शिवाय ऑरेंज झोन ग्रीन कसा होईल यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. जून महिन्यापसून मुंबई शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊन सुरळीत व्यवहार होणे अपेक्षित असेल तर सर्व जणांनी मिळून या कोरोनाचा मुकाबला करणे गरजेचं आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'ऐशीतैशी' कोरोना गंभीरतेची
BLOG | काही नावालाच 'डॉक्टर'