काल परवापर्यंत मुंबईतच काय राज्यातील बहुधा सर्वच रेल्वे स्टेशनवर, छोट्या-मोठ्या नाक्यावर चड्ड्या-बंड्या, मोबाइलचे चार्जर, इअरफोन विकणाऱ्यांनी मास्क विक्रीचा जोरदार धंदा सुरु केलाय. परंतु आपण जे मास्क तोंडावर लावतोय त्याची काळजी कशी घ्यायची हे तरी माहित आहे का? अनेक लोक दिवसभर मास्क बॅगेत किंवा खिशात ठेवून दुसऱ्या दिवशी तसाच परिधान करताना दिसतायत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे संरक्षण होणे तर दूर परंतु मोठे धोके संभवतात. त्यामुळे मास्क घालणे किंवा वापरणे, तसेच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे याला वैद्यकीय क्षेत्रात एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, ती आपण जाणून घेतली पाहिजे.
कुठल्याही बाजारात आज जर गल्लीबोळात, टपऱ्यांवर एक चक्कर मारली तर तुमच्या लक्षात येईल की हे मास्क विक्रेते येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना साद घालतयात, ती अशी की कोई भी लेलो... लाल, काला, पिला मास्क सिर्फ 50 रुपये. कधी स्वप्नातही वाटलं नव्हत, आपल्याकडे अशा पद्धतीने मास्कची विक्री होईल. आपली जनताही एवढी सजग आहे की, 100 में तीन दो, अशा पद्धतीने घासाघीस करताना दिसत होती. यापेक्षा पुढे जात ते, ये क्या साधा कपडा है, असे बोलून त्या मास्कच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून घरातील सर्व कुटुंबीयांसाठी मास्कची खरेदी करतायत. या निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्व श्रेय जातं ते अख्ख्या जगभर हाहाकार माजवण्याऱ्या कोरोना (कोविड-19) या विषाणूला.
कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर आणि जनजागृती झाल्यानंतर, प्रत्येक जण मास्क घेताना आपणास पाहावयास मिळत आहे. सुरवातीच्या काळात विशेषतः सुशिक्षित वर्गाने मेडिकलमध्ये जाऊन जितके मास्क मिळतील आणि त्या सोबत सॅनिटायझर विकत घेतले. परिणामी, मार्केटमध्ये मास्कचा आणि सॅनिटायझर मोठा तुटवडा निर्माण झाला. तसेच त्याचा काळाबाजारही झाला. काहींनी एन-95, तर काहींनी सर्जिकल मास्क धडाधड विकत घेतले, तर काहींनी चढ्या दारात मास्क घेण्यात धन्यता मानली. मात्र हे मास्क आपण कसे वापरावे याबाबत अनेकजणांनी माहिती घेण्याची साधी तसदीही घेतली नाही.
डॉ अनिल भोंडवे, इंडियन मेडिकल अससोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष सांगतात की, "पहिली गोष्ट की अनेक लोकं जी आज मास्क लावून फिरतायत, त्यांना माहितीच नाही मास्कचा वापर या काळात कसा फायदेशीर आहे. काही जण मास्क लावून खोटं समाधान मिळवत आहेत. मास्क कुणी लावावं ह्याची काही मार्गदर्शकतत्वे आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडथळा असणाऱ्या व्यक्तींनी, कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनी, संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत असलेल्यांनी श्वसनाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्स, डॉक्टरांनी मास्क घालणे अपेक्षित आहे. तसेच वापरण्याची एक योग्य पद्धत आहे. मास्क लावल्यानंतर त्याला हात लावू नये, मास्क काढताना बाहेरील बाजूला स्पर्श करू नये, मास्क गळ्याभोवती लटकवून ठेवू नये, मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धूवून घ्यावे. रुग्णायलयात किंवा क्लिनिकमध्ये वापरलेले मास्क हे बायोमेडिकल वेस्ट या प्रकारात मोडतात. ते गोळा करण्याचं काम हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या संस्था करत असतात."
तसेच डॉ. भोंडवे पुढे स्पष्ट करतात की, सध्या बाजरात जी काही कापडी मास्क मिळत आहेत, त्याची गुणवत्ता कशी आहे याची कुणालाही माहिती नाही. जर तुम्ही कापडी मास्क वापरात असाल तर रोजच्यारोज अँटीसेप्टिक द्रव्यातून धुऊन घेतला पाहिजे. काही लोक घरी आल्यानंतर तोच मास्क खिशात किंवा बॅगेत काढून ठेवतात आणि पुन्हा तसाच वापरतात. त्यामुळे तुमचं संरक्षण होण्यापेक्षा तुम्हाला धोका जास्त संभवतो. कारण दिवसभर त्याच्यावर धुळीचे बारीक कण किंवा अन्य जंतू त्यावर साठण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तोच न धुता मास्क तसाच वापरल्याने अन्य जंतूंचा शिरकाव तुमच्या शरीरात होऊ शकतो. तसेच त्याची विल्ल्हेवाट लावण्यासाठी एका पिशवीत तोच वापरलेला मास्क घट्ट बांधून तो सुक्या कचऱ्यामध्ये टाकावा. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कोणता संसर्ग होणार नाही याचं भान ठेवा. त्यामुळे मास्क वापरात असाल तर ही सर्व काळजी घेणे गरजेचे आहे.
काही दिवसापासून मार्केटमध्ये फॅशनेबल मास्क विक्रीसाठी आले आहेत. काही मास्कवर भुताचे दाताड पेंट करण्यात आले असून त्याची सध्या मार्केटमध्ये चांगलीच चलती आहे. तर काही जण थंडीत वापरणाऱ्या कानटोप्या घालून गावगन्ना हिंडत आहे. या मास्क घालण्याच्या स्पर्धेत विविध बहुरंगी, सामाजिक संदेश देणारे मास्क घालून नागरिक ती समाजमाध्यमांवर टाकून आपण कशी काळजी घेत आहोत यामध्ये धन्यता मनात आहे. लोकांनो ही सजग आणि जागरूक राहण्याची वेळ आहे, प्रत्येक वेळी विनोद केलाच पाहिजे, असं नाही. मास्कचा वापर हा संरक्षणाकरता आहे, त्याचा योग्य वापर करा आणि आपले आरोग्य सुरक्षित ठेवा.
>> या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत.
संबंधित ब्लॉग वाचा