पुलंनी वेळ दिल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी जाऊन पोहोचलो. मी गेलो दरवाजाची बेल वाजवली तर आतून चिरपरिचित आवाज आला, या या, दरवाजा उघडाच आहे. मी आत गेलो तेव्हा ते थेट अगदी त्याच अवतारात दिसले, ज्या अवतारात त्यांचे अनेकदा फोटो आणि व्यंग्यचित्रे पाहिली होती. डोळ्यावर मोठा चष्मा, केस विस्कटलेले, अंगात सदरा आणि वर उपरणे आणि समोर हार्मोनियम. काही तरी वाजवत होते. मला पाहाताच म्हणाले, लवकर आलात, मी तीनची वेळ दिली होती. तुम्ही अडीचलाच आलात. तुम्हाला काय वाटले तीन नंतर मी निघून जाईन? आणि ते खो खो हसू लागले. मलाही साक्षात पुलंना असं हसताना पाहून आनंद होत होता. एक जगविख्यात व्यक्तिमत्व, लेखक, चित्रपट निर्माते, नाटककार, अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शक माझ्यासमोर असा विनोद करून हसत होता. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.


पुलं पुढे म्हणाले, तुम्ही जेव्हा म्हणालात ना, की मला मुलाखत घ्यायची नाही, फक्त गप्पा मारायच्या आहेत. तेव्हा मला आनंद झाला. मुलाखत म्हणजे, टिपिकल असते. तुम्ही काही तरी प्रश्न मनात घेऊन आलेले असता. त्याची उत्तरे मिळाली की तुम्ही खुश होता. त्या प्रश्नांच्या पलिकडे आणि उत्तरांच्या मध्ये खूप काही असते पण तुम्ही ते पाहू शकत नाही कारण तुमच्या डोळ्यावर घोड्याला ज्याप्रमाणे झापडे लावलेली असतात. तशी असतात. झापडांमुळे घोड्याला फक्त समोरचे दिसते, आजूबाजूचे दिसत नाही. तुमचेही तसेच असते. प्रश्न आणि उत्तरं. पण तुम्ही गप्पा म्हणालात आणि मला आनंद झाला. गप्पांमध्ये बऱ्याच विषयांना हात घालता येतो. आणि बरंच काही बोलताही येतं.


पुलं बोलत होते आणि मी त्यांच्यापुढं एखाद्या अधाशी माणसासारखा बसून त्यांचे बोलणे कानात साठवत होतो. आज जमाना खूप बदललाय. व्यक्ती आणि वल्लींमध्ये बदल झालाय, बटाट्याच्या चाळीच्या जागी पोटॅटो टॉवर झालाय आणि तिथं मेहता, शाह राहायला आलेत. केवळ तेच नाही तर राजकारणही बदललंय आणि नेत्यांची वक्तव्येही.


पुलं पुढं काही तरी बोलणार तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. दरवाजा उघडून कोणीतरी आत आलं आणि मला धक्काच बसला. त्या होत्या विजया मेहता. विजयाबाईंना पाहताच पुलंना आनंद झाला. गप्पा मारण्यासाठी आणखी एक व्यक्ती उपस्थित झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी एक-दोन विनोदही केले. विजयाबाई माझ्या बाजूच्या खुर्चीत बसल्या. पुलंनी सुनिताबाईंना हाक मारली. सुनिताबाई हातात जे काही घेऊन आल्या ते पाहून मला आश्चर्य वाटले. आज मला आश्चर्याचे धक्केच बसत होते. त्या चक्क बीयरच्या बाटल्या घेऊन आल्या होत्या. पुलंनी तीन ग्लासं घेतली. आणि स्वतःच त्यात बीयर ओतू लागले. त्यांनी घेणार का वगैरे असं काही विचारलं नाही. थेट ग्लास भरला आणि विजयाबाई आणि मला दिला. पुलं म्हणाले, बीयर ओतल्यानंतर ग्लासात फेस आला की ती बियर जीवंत समजायची, फेस आला नाही म्हणजे ती मेलेली बीयर. त्यामुळे तशा बियरच्या वाट्याला न गेलेलेच बरे. त्यांनी चियर्स केल्यामुळे मलाही चियर्स करावं लागलं.


तर आपण कुठे होतो. हा बदलत्या राजकारणाकडे असं म्हणून पुलं पुढे म्हणाले, आज वातावरण किती बदललंय हे वर्तमानपत्र वाचलं की कळतं. सोशल मीडियावर कोणी काही तरी लिहितं आणि त्याला लगेच तुरुंगात टाकलं जातं. माझ्या वेळी जर असं काही असतं तर मला रोज पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढायला लागल्या असत्या. आम्ही बिनधास्त भाषणे करीत असू, कुठल्याही समाजावर, कुठल्याही नेत्यावर बिनधास्त टीका करीत असू. ती कोणीही मनावर घेत नसे. उलट त्याकडे खेळीमेळीने पाहिले जात असे. शरद पवारांना विचारा. आम्ही गप्पा मारताना किती आणि कशा गप्पा मारायचो ते. शरद पवारही विनोद करण्यात तरबेज आहेत. मात्र त्यांचे हे रूप फार कमी लोकांना ठाऊक आहे. किती कोट्या आणि काय काय? आता तर म्हणे लोक खासगीतही कोट्या करणे टाळतात. म्हणतात कुठे कोणी मोबाईल चालू करून ठेवला असेल काय माहिती? उगाचच आयतं कोलीत का द्या? असं हे आजचं तुमचं वातावरण. तुम्ही कसं जगता, वागता आणि काम करता या वातावरणात तेच मला कळत नाही.


तेवढ्यात विजया मेहताही बोलत्या झाल्या, साहित्यिकही गप्प आहेत. आपल्यावेळी तसं नव्हतं. आपण बिनधास्त सरकारच्या विरोधात बोलायचो. तुमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे प्रकरण तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. आज प्रत्येक जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय जे अत्यंत वाईट आहे. साहित्यिक, कलाकारही राजकीय पक्षांमध्ये विभागले गेलेत.


मी आपला गप्प बसून त्या दोघांचे बोलणे कानात साठवत होतो. पुलं बोलत होते. अचानक माझ्यासमोरचा ग्लास लवंडला आणि ग्लासातली बीयर माझ्या अंगावर सांडली. मी ताडकन उभा राहिलो आणि बियर झटकू लागलो. तेव्हा कोणीतरी मला चापट्या मारल्यासारखे वाटले. मी बघितले तर माझी बायको चापट्या मारून मला उठवत होती आणि म्हणू लागली, काय गाढवासारखे हात पाय झाडतोयस, उठ आता. मी उठून बसलो आणि माझ्या लक्षात आले की मी स्वप्नात पुलं, विजयाबाई आणि सुनिताबाईंना भेटलो होतो आणि स्वप्नात पुलं माझ्याशी गप्पा मारत होते. बायकोला ही गोष्ट सांगताच ती म्हणाली, नशिबवान आहेस, तुझ्या स्वप्नात पुलं येतात. खरोखरंच मी नशीबवान आहे.


चंद्रकांत शिंदे यांचे इतर ब्लॉग :