आज भारतीय जनता पार्टीच्या 42 व्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच भाषण केले. भाजपची घोडदौड आणि इतिहास सांगतानाच त्यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवर हल्लाबोल केला. एका विशिष्ट घराण्याची भक्ती आणि देशभक्ती असे दोन प्रकारचे राजकारण देशात सुरू असून, देशातील काही पक्ष केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी काम करत आहेत. घराणेशाहाविरोधात भाजपनेच सर्वप्रथम आवाज उठवला. संविधानाला महत्व न देणारे घराणेशाहीचे सरकार लोकशाहीचे शत्रू असते. मात्र या घराणेशाहीच्या पक्षांना भाजपने टक्कर दिली आणि देशवासीयांचे नुकसान होऊ दिले नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच घराणेशहीवर टीका केलीय असे नाही तर गेल्या काही काळापासून ते सतत देशातील राजकारणात असलेल्या घराणेशाहीविरोधात बोलत आलेले आहेत. 2014  मध्ये राष्ट्रीय राजकारणात जेव्हा नरेंद्र मोदी यांनी उडी घेतली तेव्हाच त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता घराणेशाहीवर टीका करण्यास सुरुवात केली होती. निवडणुकीतही त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला होता. 2014  पासून ते सतत आजपर्यंत नरेंद्र मोदी घराणेशाहीच्या विरोधात बोलत आले आहेत.


मागील वर्षी संविधान दिनाच्या दिवशी बोलतानाही त्यांनी राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे असे वक्तव्य केले होते. एका पक्षाची सूत्रे पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणे लोकशाहीच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.


अनेकांना वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त काँग्रेस आणि गांधी घराण्यावरच घराणेशाहीवरून टीका करतायत. पण तसे नाही. याचे कारण म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यापैकी बरेच पक्ष हे घराणेशाहीचेच आहेत. पक्षाचे नेतृत्व घरातच दिले जाते आणि निवडणुकीसाठीही घरातील व्यक्तींचाच प्रामुख्याने विचार केला जातो. मंत्रीमंडळातही घरातील सदस्यांना स्थान दिले जाते. देश, राज्याचे काहीही होवो, कुटुंब वाचले पाहिजे असा या प्रादेशिक पक्षंच्या नेत्यांचा विचार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.


लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादवला पुढे आणले. आज तेजस्वी पक्षाची धुरा सांभाळत आहे. देशातील विरोधकांची मोट बांधून पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहाणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या मुलाला केटीआरला पुढे आणत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुढे आणले. आता उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही मैदानात आहेत. यूपीत अखिलेश यादव भाजपला कडवी टक्कर देत आहेत. ही काही लगेच आठवणारी उदाहरणे आहेत ज्यात घरातच पक्षातील सर्व मोठी पदे दिली गेल्याचे दिसून येत आहेत. महाराष्ट्रात तर शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्याचे आपण पाहतोच आहोत.


आगामी काळात भाजपला विविध राज्यांमध्ये याच प्रादेशिक पक्षांशी लढत द्यायची आहे. काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट असल्याने भाजपला काँग्रेसची तितकीशी भीती वाटत नाही. पण राज्ये काबिज करण्यासाठी या प्रादेशिक पक्षांशी दोन हात करणे कठिण जाऊ शकते. त्यामुळेच नरेंद्र मोदी पक्षातील घराणेशाहीवर सतत टीका करीत आहेत.


घराणेशाहीवर टीका केल्याने अशा पक्षातील इतर नेते विचारात पडू शकतात. पक्षासाठी खस्ता खाऊनही वरून कोणीतरी येतो आणि डोक्यावर बसतो हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा मोदी प्रयत्न करतायत. निवडणुकीच्या काळात तिकीटेही कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्याऐवजी पैसेवाल्यांना दिली जातात असेही कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या कार्यकर्ते, नेत्यांच्या मनात असे विचार येण्यास सुरुवात झाली की त्याचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होणे निश्चित आहे. घराणेशाहीवर टीका करतानाच नरेंद्र मोदी भाजप कसा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यास विसरत नाहीत. नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने घराणेशाहीला डावलत अनेकांची तिकिटे कापली होती. मात्र काही नेत्यांच्या मुलांना तिकीटे दिली होती हेसुद्धा खरे आहे. पण हे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेने कमीच आहे. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यालाही महत्व असते हे नरेंद्र मोदी सतत दाखवून देतात. त्यामुळे प्रादेशिक पक्षातील कार्यकर्ते, नेते यांच्यात चलबिचल व्हावी असा त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे. आणि काही प्रमाणात ते यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.


एकूणच विरोधकांना आता भाजपच्या आक्रमक प्रचारासमोरच घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देत लढा द्यायचा आहे. पक्षातील सामान्य कार्यकर्त्याच्या मनात घराणेशाहीबाबत तिरस्कार निमाण झाला तर घराणेशाहीतून आलेल्या पक्षांना विजय मिळवणं कठिण होऊ शकेल. मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपावर विरोधक कोणतं प्रभावी शस्त्र शोधून काढतात यावरच त्यांचे यश अवलंबून आहे हे मात्र नक्की.


चंद्रकांत शिंदे यांचे इतर लेख :