नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. पंजाबमधील सत्ता तेथील सुंदोपसुंदीकडे काँग्रेस नेतृत्वाने लक्ष न दिल्याने आपच्या हातात गेली. ज्या काँग्रेसचे कधी काळी संपूर्ण देशावर राज्य होते तो काँग्रेस पक्ष आत फक्त दोन-तीन राज्यांमध्ये सत्तेत आहे. महाराष्ट्रात तर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला सत्तेची ऊब मिळालीय. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर असूनही राहुल गांधी, सोनिया किंवा प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवलेले नाही. आपण कोणामुळे सत्तेत आहोत याची त्यांना जाणीव असल्याने त्यांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचे स्पष्टपणे दिसून येते.


पण आपला विषय महाराष्ट्र नसून गुजरात आहे. खरे तर 2017 मध्ये राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये वातावरण पूर्ण बदलून टाकले होते.भाजपला पछाडून काँग्रेस सत्तेवर येईल असे म्हटले जात होते. पण तसे झाले नाही आणि भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले. 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसची अवस्था काही चांगली नव्हती. 15 च्या आसपास आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली होती. तरीही राहुल गांधी यांनी चांगला प्रचार करून भाजपला 100 च्या आत रोखले पण सत्तेपासून वंचित करू शकले नाहीत. 2017 च्या निवडणुकीत 182 जागांपैकी भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.


गुजरातमध्ये आता डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच गुजरातमध्ये रोड शो करून प्रचाराचा बिगुल वाजवला. एवढेच नव्हे तर आपचे अरविंद केजरीवाल यांनीही गुजरातमध्ये सर्वच्या सर्व  182 जागा लढवणार असल्याचे घोषित केले. तसेच त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह गुजरातचा दौराही केला. पण ज्या गुजरातमध्ये काँग्रेसचे 77 आमदार आहेत तिकडे काँग्रेसने मात्र अजूनही दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे.


पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी ज्या हार्दिक पटेलला राहुल गांधी काँग्रेसमध्ये घेऊन आले तो हार्दिकही काँग्रेसवर नाराज झालाय. काँग्रेस नेतृत्व गुजरातबाबत त्वरित निर्णय घेत नसल्याचा आरोप हार्दिकनं केलाय. आता तर त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं नावही काढून टाकलंय.हिंदुत्वाकडे वळणाऱ्या हार्दिकवर भाजपने जाळे पसरलेय. केवळ हार्दिकच नव्हे तर 77 आमदारांपैकी 13 आमदार भाजपने अगोदरच स्वतःकडे वळवून घेतलेत. गुजरातमधील काँग्रेसचे आदिवासी नेते आमदार अश्विन कोतवाल यांनीही काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नव्हे तर आगामी काही महिन्यात आणखी 7 ते 8 काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले जातेय. 2017 मध्ये 99 जागा जिंकलेल्या भाजपचे सध्याचे बळ 111 वर आलेले आहे.


हार्दिक पटेल भाजपकडे वळण्याची चिन्हे दिसत असताना जिग्नेश मेवानी मात्र भाजपला टक्कर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. पण भाजपने जिग्नेश मेवानीलाही घेरण्याची रणनीती आखलीय. काँग्रेसचेच माजी आमदार मणिलाल वाघेला यांना जिग्नेश मेवानीच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात भाजप उतरवणार असल्याचे म्हटले जातेय. भाजपने यावेळी 182 पैकी 150 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे आणि त्यासाठी काँग्रेस आमदार फोडण्यासोबतच भाजपने आदिवासी भागावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केलीय. याचे कारण राज्यातील 27 जागा या आदिवासी समुदायासाठी आरक्षित आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने आदिवासींच्या जागांमध्ये चांगले यश मिळवले होते. यावेळेस काँग्रेसला ते यश मिळू न देण्याचा चंग भाजपने बांधलाय. शहरी उमेदवार भाजपपासून दूर जाणार नाही असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे आदिवासी भागासोबतच दलित आणि ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केलेत. काँग्रेसचे ओबीसी आमदार अल्पेश ठक्कर यांनीही काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेय.


अशी परिस्थिती असतानाही काँग्रेस मात्र अजून निवडणूक मोडमध्ये आलेली दिसत नाही. पंजाब निवडणुकीपूर्वी तेथे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद काँग्रेसने सोडवला नाही. उलट कॅप्टन अमरिंदर यांना राजीनामा देण्यास सांगितले. नंतर चरणसिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले पण त्यांच्याशीही सिद्धूचे पटले नाही. तिकीट वाटपात गोंधळ झाला. सिद्धू आणि चन्नी यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती पंजाबसारखीच होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरु असून काँग्रेसमधील नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना गुजरातकडे लक्ष का द्यावेसे वाटत नाही हा कळीचा प्रश्न आहे. पाटीदार नेते नरेश पटेल काँग्रेसमध्ये येऊ इच्छित होते पण राज्यातील काही काँग्रेस नेत्यांनीच त्याला विरोध केला आणि त्यामुळेच राहुल गांधींनी नरेश पटेल यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच हार्दिक पटेल नाराज असल्याचे सांगितले जात आहे.


कदाचित गुजरातमध्ये आपल्याला यश मिळणार नाही हे काँग्रेस नेतृत्वाने गृहित धरले असावे असेच एकूण चित्र पाहाता दिसत आहे. जर काँग्रेसने लक्ष दिले नाही तर पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही अरवंद केजरीवाल यांचा आप काँग्रेसची जागा मिळवून प्रमुख पक्ष बनेल असे म्हटले जात आहे. असे झाले तर आणखी एका राज्यातून काँग्रेस बाहेर फेकली जाईल यात शंका नाही.