पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही काळापासून दक्षिण भारताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या मिशन 2024 साठी दक्षिण भारत फार मोठी आणि महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्यामुळेच भाजप आणि पंतप्रधान मोदी सतत दक्षिण भारतातील राज्यांकडे लक्ष देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणा आणि तामिळनाडूचा नुकताच धावता दौरा केला. तेलंगणात पोहोचल्यानंतर त्यांनी घराणेशाही आणि अंधश्रद्धेवर निशाणा साधत एक प्रकारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना लक्ष्य केले. केसीआर सध्या तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची स्वप्ने पाहत असल्याने त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. तेलंगणानंतर पतंप्रधान मोदींनी तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण केलं. मोदींच्या या दौऱ्याचा उद्देश्य दक्षिण भारतात भाजपची वाढ करणं हाच आहे.


भाजपची दक्षिण स्वारी का? तर याचं उत्तर आहे दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यातील लोकसभेच्या 129 जागा. दक्षिणेत भाजपची कर्नाटक वगळता ताकद जवळ जवळ नाहीच. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये भाजपची ताकद चांगलीच आहे. मात्र 2024 चा विचार करता भाजपनं 2019 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट्य ठेवलंय आणि त्याचाच भाग म्हणून ही दक्षिण स्वारी आहे. 


कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपने इथं 25 जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र कर्नाटकमध्ये भाजपमध्ये गटबाजी वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील सत्ता कायम ठेऊन लोकसभेला 25  किंवा त्यापेक्षा जास्त जिंकण्याचं आव्हान भाजपपुढे आहे. ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत तेथील मुख्यमंत्री बदलण्याची परंपरा भाजपने कर्नाटकातही कायम ठेवलेलीच आहे. भाजपनं काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले. कर्नाटकमध्ये भाजपची ताकद असली तरी बाकीच्या चार राज्यांमध्ये तशी ताकद नाही.


तामिळनाडूमध्ये भाजपच्या खासदारांची संख्या शून्य आहे. तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत यूपीएने 38 जागा जिंकल्या तर एआयएडीएमकेला फक्त एक जागा मिळाली होती. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एआयएडीएमकेसोबतच युती केली आणि निवडणुक लढवली. भाजपला चार जागांवर विजय मिळाला. त्यानंतर भाजपने तामिळनाडूमध्ये पाय पसरण्यास सुरुवात केली आणि स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळवले आणि भाजप कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यास सुरुवात केली. 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस भाजपचा आहे मात्र त्यांची वाट फार बिकट आहे. भाजप हा उत्तर भारतातील हिंदुत्ववादी पक्ष असून तो हिंदी लादण्याचा प्रयत्न करतोय अशी इमेज तामिळनाडूत तयार करण्यात आलेली आहे. भाजपला अगोदर त्यांची ही इमेज पुसून काढावी लागेल आणि तामिळनाडूतील नागरिकांशी कनेक्ट व्हावे लागेल तरच त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपला याची जाणीव असल्यानेच भाजप तामिळनाडूकडे जास्त लक्ष देत आहे.


आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 22 जागांवर तर तीन जागांवर टीडीपीने विजय मिळवला होता. आंध्र प्रदेश का कधी काळी काँग्रेसचा गड होता. पण 2014 मध्ये आंध्रप्रदेशचे दोन तुकडे होऊन तेलंगणाची निर्मिती झाली आणि आंध्रातील मतदार काँग्रेसपासून दूर झाले. 2019 च्या निवडणुकीत भाजपला काही यश मिळाले नाही. काश्मीरमधून कलम 370 हटवणे आणि कोरोनाकाळातील मदत यामुळे येथील मतदार भाजपकडे वळेल असा विश्वास भाजप नेत्यांना वाटतोय. मात्र काँग्रेससोबतच टीडीपी आणि वायएसआरसीपीशीही भाजपला लढत द्यायची असल्याने लढाई सोपी नसेल हे मात्र नक्की.


केरळ हा काँग्रेसचा गड आहे. केरळमध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 20 पैकी 15 जागांवर विजय मिळवला होता. राहुल गांधी यांना केरळमधील वायनाडनेच हात दिल्याने ते लोकसभेत दिसत आहेत. खरे तर 2019 ला काँग्रेसची स्थिती म्हणावी तितकी चांगली नसतानाही त्यांनी यश मिळवले. भाजपला मात्र 2024 मध्ये केरळमध्ये यश मिळेल असे वाटतेय. आणि याचे कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली पोप यांची भेट. यामुळे ख्रिश्चन समुदायात नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळली असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. त्यातच भाजपने ख्रिश्चन मुलगी आणि मुस्लिम मुलाच्या लग्नावरून लव्ह जिहादचा मुद्दा केरळमध्येही उपस्थित केला आणि त्याला ख्रिश्चन समुदायाचा पाठिंबाही मिळाला आहे. केरळमध्ये 20 टक्के नागरिक हे ख्रिश्चन आहेत आणि भाजप केरळमध्ये हा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे.


नव्याने तयार झालेल्या तेलंगणामध्ये केसीआर यांनी भाजपला पाय रोवू न देण्याचे ठरवले आहे. येथे लोकसभेच्या 17 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चार जागांवर विजय मिळवला होता. तर केसीआर यांच्या टीआरएसला सात जागा मिळाल्या होत्या. 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने केसीआरना धक्का देत त्यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपचे पाच आमदार होते पण आता फक्त दोनच आहेत पण चार खासदार असल्याने भाजपने येथे ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. तेलंगणात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजप येथे ओबीसी नेतृत्व पुढे करीत आहे. पुढील वर्षी तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत ओबीसी नेतृत्व जर भाजपला यश मिळवून देऊ शकले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.


ही सर्व पार्श्वभूमी असल्यानेच आणि लोकसभेच्या 129 जागा असल्यानेच भाजपने दक्षिण भारताकडे आपले लक्ष वळवले आहे. आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताचे दौरे मोठ्या प्रमाणावर करू लागलेत हे मात्र नक्की. 


चंद्रकांत शिंदे यांचे इतर ब्लॉग :