Yogini Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात तब्बल 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधलं जातं. एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे. या काळात भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी योग्य प्रकारे आणि मनोभावे भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांवर विष्णूची कृपा दृष्टी राहते आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते. आज ज्येष्ठ महिन्यातील अकरावी तिथी असून या दिवशी योगिनी एकादशी (Yogini Ekadashi 2024) साजरी केली जाते. या एकादशीविषयी अधिक जाणून घेऊया.


योगिनी एकादशी व्रत कसं करावं?


वैदिक शास्त्रानुसार, योगिनी एकादशीचं व्रत योग्य तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळतं. यादिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करून व्रत ठेवावं. एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते. शुभ परिणाम मिळण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावाने करणं आवश्यक आहे. शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी टाळल्या पाहिजे. त्या गोष्टी योगिनी एकादशी दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


योगिनी एकादशी दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?



  • ज्योतिषशास्त्रानुसार, योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे. योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो.

  • भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा. मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पानं घेऊन ठेवावी. यामागेसुद्धा महत्त्वाचं कारण आहे. शास्त्रानुसार योगिनी

  • एकादशी दिवशी तुळशीसुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्यादिवशी तुळशीला पाणी घालणं, तुळशीची पानं तोडणं या गोष्टी अशुभ मानल्या जातात, कारण असं केल्याने तुळशीचं व्रत तुटतं.

  • योगिनी एकादशीला कांदा, लसूण, आणि अन्य तामसिक पदार्थांचं सेवन करणं अशुभ असतं. जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केला तर तुम्हाला विष्णू देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं.


योगिनी एकादशीचं महत्त्व


पुराणानुसार, योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्यास मनुष्याला मृत्यूनंतर स्वर्गवास लाभतो, अशी धारणा आहे. अशा व्यक्तीला वैकुंठ लोकात जाण्याचं भाग्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णांनी देखील युधिष्ठिराला योगिनी एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Yogini Ekadashi 2024 : आज योगिनी एकादशी; उपवास कधी सोडावा? जाणून घ्या पारण वेळ, शुभ मुहूर्त आणि महत्त्व