Vasubaras 2025 : गाय-वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक 'वसुबारस'; वाचा या दिनाचं महत्त्व आणि पूजा विधी
Vasubaras 2025 : वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू (गोवत्स) यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते.

Vasubaras 2025 : 'वसुबारस' (Vasubaras) हा दिवस दिवाळी (Diwali 2025) सणाची सुरुवात मानला जातो. हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला (बाराव्या दिवशी) साजरा केला जातो. याला 'गोवत्स द्वादशी' असेही म्हणतात.
'वसू' म्हणजे धन आणि 'बारस' म्हणजे द्वादशी (बारावा दिवस). 'गो' म्हणजे गाय आणि 'वत्स' म्हणजे वासरू. थोडक्यात, वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू (गोवत्स) यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
दिवाळीतील वसुबारसचे महत्त्व :
भारतीय संस्कृती आणि कृषीप्रधान समाजात गायीला 'गोमाता' मानून अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे वसुबारसच्या दिवशी गाईची पूजा करण्यामागे खूप महत्त्वाची कारणे आहेत.
कृतज्ञता व्यक्त करणे :
गायीमुळे मानवी जीवनात दूध, तूप यांसारखे महत्त्वाचे पदार्थ मिळतात, तसेच शेतीतही तिची मोठी मदत होते. या सर्व उपकारांसाठी गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
धन आणि समृद्धी: 'वसू' (धन) साठी असलेल्या या दिवशी गाईची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि धन-धान्याची वृद्धी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
आरोग्य आणि कल्याण :
कुटुंबातील सदस्यांच्या आणि मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच सुख-समृद्धीसाठी विवाहित स्त्रिया या दिवशी गोवत्सासह गायीची पूजा करतात आणि उपवास करतात.
सणाची सुरुवात :
महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी वसुबारसच्या दिवसापासूनच दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढायला सुरुवात करतात आणि संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ तसेच दारात पणत्या लावून रोषणाई केली जाते.
पूजा विधी :
या दिवशी सवत्स गायीला स्नान घालून, तिचे हळद-कुंकू लावून वस्त्र व फुलांनी पूजन केले जाते. तिला नैवेद्य (उदा. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी) दाखवला जातो. काही स्त्रिया या दिवशी गहू आणि मूग यांचे पदार्थ खाणे टाळतात.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :















