Ratha Saptami 2024 : हिंदू धर्मात रथ सप्तमीला (Ratha Saptami) विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. यंदा रथसप्तमी आज, म्हणजेच शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते, हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
पद्म पुराणानुसार, या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथ सप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशीची सूर्याला अर्घ्य दिल्याने, सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात आणि आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी ज्या महिला उपवास करतात त्यांच्यावर सूर्य देव प्रसन्न होतात.
रथसप्तमी तिथी (Ratha Saptami Tithi Muhurta)
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजून 12 मिनिटांनी सुरू झाली आणि ती दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 08 वाजून 54 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 16 फेब्रुवारीला रथ सप्तमी साजरी केली जाईल.
रथसप्तमीला अशी करा सूर्याची पूजा (Ratha Saptami Surya Puja)
पौराणिक कथांनुसार, सूर्यदेव हे अदिती आणि कश्यप यांचे पुत्र आहेत. सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते, या दिवशी सूर्य पूजनाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करावं आणि सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं. घराच्या बाहेर किंवा मध्यभागी सात रंगांच्या रांगोळी काढा. त्याच्या मध्यभागी एक दिवा लावा. सूर्य देवाला लाल रंगाचं फुल, कुंकू, अक्षता गुळ, चणे अर्पण करा. या दिवशी गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा किंवा सूर्यदेवाची आरती करा.
रथसप्तमीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी (Don't Do These Things On Ratha Saptami)
रथ सप्तमीच्या दिवशी घरात भांडण करू नका.
रथ सप्तमीच्या दिवशी वडीलधाऱ्या व्यक्तींना उलटं बोलू नये, त्यांचा आदर करावा.
रथ सप्तमीच्या दिवशी मांसाहार करू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :