Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देशभरात आज उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येतही रामभक्तांची गर्दी जमली आहे. रामाप्रती आपली भक्ती दाखवण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग असतात. अशात देशात एक असाही समाज आहे, ज्यांनी संपूर्ण अंगभर रामाचं (Ram) नाव गोंदून घेतलं आहे. या समाजाच्या लोकांनी आपल्या पूर्ण शरीराला रामाच्या नावे समर्पित केलं आहे.
कधीच मंदिरात जात नाही हे लोक
छत्तीसगडमध्ये अस्तित्वास असणारे हे लोक राम नाम शरीरावर गोंदून घेतात आणि बहुतांश वेळा रामाचं नाव लिहीलेलेच कपडे परिधान करतात. यासोबतच हे लोक रामचरितमानस आणि रामायणाची देखील पूजा करतात. या समाजाचे लोक ना कोणत्या मंदिरात जातात, ना कोणत्या रामाच्या मूर्तीची पूजा करतात. या विशिष्ट समाजाला 'रामनामी' असं संबोधलं जातं.
रामनामी समाजाच्या मान्यतेनुसार, त्यांचा राम हा कोणत्या मंदिरात किंवा मूर्तीत नाही, तर प्रत्येक माणसात, झाडा-वेलींत आणि पशुपक्षांमध्ये सामावलेला आहे.
संपूर्ण शरीरावर गोंदतात रामाचं नाव
छत्तीसगडच्या चांदली गावातून रामनमी समाजाची सुरुवात झाली. गुलाराम रामनामीजी हे या समाजाचे एक मुख्य सदस्य आहेत, ज्यांनी रामनामी समाजाबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं.
गुलारामजींच्या मते, शरीरावर राम लिहिण्याला रामनामी समाजात विशेष महत्त्व आहे. रामनामी समाजात 3 प्रकारचे लोक राहतात - ज्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर रामाचं नाव गोंदवलं जातं, त्यांना रामनामी म्हणतात. ज्यांच्या कपाळावर दोन राम नाम गोंदवले जाते, त्यांना शिरोमणी म्हणतात. ज्यांच्या संपूर्ण कपाळावर रामाचं नाव गोंदवलं असतं, त्यांना सर्वांग रामनामी म्हणतात. ज्यांच्या संपूर्ण शरीरावर रामाचं नाव गोंदलेलं असतं, त्यांना नख शिखा रामनामी म्हणतात.
नवीन पिढीकडून राम नाम गोंदवण्यास टाळाटाळ
गेल्या 20 पिढ्यांपासून हा समाज शरीरावर राम नाम गोंदण्याची अनोखी परंपरा पाळत आहेत. परंतु, नवीन पिढीतील लोक संपूर्ण अंगावर राम नावाचा टॅटू काढण्यास टाळाटाळ करू लागल्याचं गुलारामजी म्हणाले. मोठ्यांच्या दबावाखाली किंवा परंपरा पाळण्याच्या नावाखाली ते कपाळावर किंवा हातावर एक-दोन ठिकाणी रामाचं नाव गोंदवून घेतात.
मंदिरात प्रवेश करता आला नाही म्हणून शरीराला बनवलं मंदिर
1890 च्या सुमारास रामनामी समाजाची सुरुवात झाली. या समाजाची स्थापना परशुराम नावाच्या दलित माणसाने केली होती, ज्याला उच्च जातीच्या लोकांनी तो खालच्या जातीचा असल्याचं समजून मंदिरात प्रवेश दिला नाही. या घटनेच्या निषेधार्ध त्यांनी स्वत:चं समाज स्थापन केला आणि अंगभर श्री रामाचं नाव गोंदवू लागले. हा समाज मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये पसरलेला आहे.
रामनामी समाज म्हणजे काय?
गुलारामजी म्हणतात, 'भारताला जातिव्यवस्था, उच्च-नीच, भेदभाव आणि अस्पृश्यतेचा खूप जुना इतिहास आहे. आपल्या देशाचं एक मोठेपण म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात राम असतो. सकाळी उठल्यावर राम हे नाव उच्चारलं जातं आणि मृत्यूनंतरही राम नाम सत्य है म्हटलं जातं.
रामनामी समाजाचे नियम
गुलारामजी म्हणतात, "आमच्या समाजाचे कोणतेही नियम नाहीत आणि जातीचं बंधन नाही. देवाला कोणी राम म्हणतो, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी देव म्हणतो किंवा कोणी अल्लाह म्हणतो, हे सर्व समान आहेत. आम्ही कोणत्याही दिखाऊपणावर नाही, तर शरीराच्या शुद्धतेवर लक्ष केंद्रित करतो. पण, जर ती व्यक्ती मांस खाणारी असेल, दारू पिणारी असेल किंवा गायींची कत्तल करत असेल तर ते या समाजात सामील होऊ शकत नाहीत. मनाने, कृतीने आणि वाणीने रामनामावर श्रद्धा ठेवणारी व्यक्ती रामनामी समाजात सामील होऊ शकते. शरीर हे सर्वात मोठे मंदिर आहे ज्यामध्ये राम वास करतो.फक्त स्वतःला पूर्णपणे रामाला समर्पित करा."
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: