Sanjay Raut नाशिक : काही लोक म्हणतात की, राम मंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन खुले, डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये ज्या ठिकाणी उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे.


त्या डेमोक्रेसी हॉटेल परिसरातच 'रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ' हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. 


प्रदर्शनातून भाजपवर टीका


या प्रदर्शनामध्ये बाबरी मशीदचा पाडलेला ढाचा, आंदोलनात शिवसेनेचे योगदान, बाळासाहेब ठाकरेंची त्याबाबतची भूमिका याबाबत माहिती देणारे होर्डिंग, चित्रफीत तर आहेच मात्र त्यासोबतच भाजपवरही होर्डिंग्सच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.   


'राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ'प्रदर्शनाची संकल्पना सुभाष देसाईंची


संजय राऊत म्हणाले की, 'राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ'या प्रदर्शनाची संकल्पना सुभाष देसाई यांची. त्यांनी या प्रदर्शनासाठी अत्यंत मेहनत घेतली. अधिवेशन करायचे ठरले तेव्हा त्यांच्या डोक्यात असे आले की, अयोध्येला आपण जात नाहीये. अयोध्येच्या राम मंदिर संघर्षात शिवसेनेचे जे योगदान आहे. ते सगळ्यांना माहीत व्हावे. 


त्यांच्यासाठी हे दालन खुलं - संजय राऊत


ते पुढे म्हणाले की, आपण पाहले असेल की, तरुणपणीचे सुभाष देसाई आपल्याला दिसले होते. शाळेतला मुलगा दप्तर घेऊन जातो. तसे ते पाठीला हत्यार बांधून चाललेले होते. मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे, शेकडो शिवसैनिक त्यावेळी उपस्थित होते. हा आमचा ठेवा आहे. काही लोक असे म्हणतात की, शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन खुले, डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


आता कोणी कितीही श्रेय घेऊद्या - संजय राऊत


शिवसेनेचे वाघ नसते तर या हिंदुत्वाला जो अनेक वर्षांपासून कलंक होता तो दूर झाला नसता. आता कोणी कितीही श्रेय घेऊद्या. हे फार घाईने झालेले प्रदर्शन आहे. यात अजून सुधारणा होतील.  संपूर्ण महाराष्ट्र हे बघेल. सुरुवात आम्ही नागपूरपासून करणार कारण देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की, त्यांच्या काही स्मृतींना उजाळा मिळावा. 


संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल


कारसेवक फोटो ट्विटवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना डिवचलं, ते म्हणाले की, संपूर्ण देशातील राम सेवक तिथे हजर होते.त्यावेळेस सगळे हिंदू म्हणून जमले होते पक्ष म्हणून नाही. आता यांना पक्ष आठवताय राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला. तेव्हा पक्ष नव्हता तीन प्रमुख नेते होते. ते म्हणजे अशोक सिंगल, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी. त्यांनी आंदोलन पुढे नेलं. लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले. सामान्य लोकांना प्रेरित करण्याचे काम बाळासाहेब ठाकरेंनी केले. काही लोक नागपूरची ट्रेन पकडायला गेले, ते फोटो दाखवताय मात्र अयोध्येत शिवसैनिक पोहोचले होते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.  


आणखी वाचा


Uddhav Thackeray Nashik Visit Live Updates : उद्धव ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...