Narak Chaturdashi 2024 : हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या सणांपैकी एक म्हणजेच दिवाळीचा (Diwali 2024) सण. हिंदू धर्मानुसार आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, आजचा दिवस हा नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) आहे. या दिवसाला पहिली अंघोळ आणि छोटी दिवाळी असंही म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नानाना विशेष महत्त्व असतं. पण, अनेकांना यामागचं महत्त्व नेमकं काय हेच माहीत नाही. त्यामुळेच या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
अभ्यंगस्नानाचं महत्व
नरक चतुर्दशीचा दिवस मृत्यूचा देव यमराजाला समर्पित मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोक या विशेष दिवशी अभ्यंग स्नान करतात ते नरकात जाणं टाळू शकतात, तसंच त्याना मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होते. अभ्यंगस्नान हे केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाचं नव्हे, तर याचे अनेक शारीरिक फायदेही होतात.
अभ्यंगस्नानाची पद्धत
नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांनी ब्रह्म मुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी उठून तीळ किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करून स्नान करावे. महिलांनी हळद, चंदन आणि मोहरीच्या तेलाचा लेप तयार करून तो अंगावर लावावा आणि आंघोळ करावी. या अभ्यंगस्नानानंतर दिव्याचे दान केले जाते.
अभ्यंगस्नानाची पौराणिक कथा
पौराणिक कथेप्रमाणे नरकासुर नावाचा एक बलाढ्य राजा उन्मत्त झाला आणि त्यांनी सर्वत्र उच्छाद मांडला तेव्हा इंद्राने नरकासुरापासुन सुटकेसाठी भगवान कृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने नरकासुराचा वध केला. मरताना नरकासुराला पश्चात्ताप झाला आणि त्यांनी कृष्णाकडे वर मागितला की, आजच्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवशी जो अभ्यंगस्नान करील त्याला नरक यातना होऊ नयेत. भगवान श्रीकृष्णाने ते मान्य केले आणि या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरू झाली. अशी ही अभ्यंगस्नानाबाबत सांगितल्या जाणाऱ्या अनेक कथांपैकी एक कथा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: